कऱ्हाडसह मलकापुरात कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:37 AM2021-04-11T04:37:46+5:302021-04-11T04:37:46+5:30
राज्यासह जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी राज्य शासनासह जिल्हा प्रशासनाने शनिवार ...
राज्यासह जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी राज्य शासनासह जिल्हा प्रशासनाने शनिवार व रविवार दोन दिवस लॉकडाऊनवजा कडक निर्बंधाचा आदेश काढला आहे. शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ असा या कडक निर्बंधाचा कालावधी आहे. शनिवारी पहिल्याच दिवशी कऱ्हाड व मलकापुरात मेडिकल, दूध संस्था व दवाखाने शासनाने ठरवून दिलेल्या वेळेत सुरू ठेवले होते. या अत्यावशक सेवा वगळता शहरातील किराणा दुकान, भाजीपाला व्यवसायासह सर्व दुकाने सकाळपासूनच कडकडीत बंद ठेवून नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे शहरातील उपमार्गासह अंतर्गत रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता. विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर बारीक नजर ठेवण्यासाठी चौकाचौकांत पोलीस कर्मचारी तैनात केले होते.
शहरातील कोल्हापूर नाक्यासह भेदा चौक, विजय दिवस चौक, कृष्णा नाका, कृष्णा कॅनॉल याठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात होते. विनाकारण कोणी रस्त्यावर फिरताना आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जात होती.
- चौकट
बाहेरून येणाऱ्यांची कसून चौकशी
कऱ्हाडसह मलकापूर शहरात पोलीस गस्त घालून ये-जा करणाऱ्यांना थांबवून कसून चौकशी करत होते. येथील शिवछावा चौकातून मार्गस्थ होणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करूनच जाऊ दिले जात होते. दिवसभर पोलीस कर्मचारी चौकाचौकांत तळ ठोकून होते.
- चौकट (फोटो आहे)
अंतर्गत रस्त्यालाही शुकशुकाट
कोरोनाबाबतची परिस्थिती सर्वसामान्य होईपर्यंत प्रत्येक शनिवार व रविवार जीवनावश्यक वस्तूंची दुकानेही ठराविक वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार पहिल्याच शनिवारी चांगला प्रतिसाद मिळाला. नागरिकांनीच उत्स्फूर्तपणे बाहेर न पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे अंतर्गत रस्ते व मुख्य बाजारपेठेतही शुकशुकाट होता.
फोटो : १०केआरडी०६
कॅप्शन : मलकापुरातील शिवछावा चौकात शनिवारी शुकशुकाट दिसत होता. (छाया : माणिक डोंगरे)
फोटो : १०केआरडी०७
कॅप्शन : कऱ्हाड शहरातील मुख्य बाजारपेठेकडे जाणाऱ्या मार्गावर दत्त चौकात शनिवारपासून पोलिसांनी बॅरिकेड उभारून वाहतूक रोखली आहे. (छाया : अरमान मुल्ला)
फोटो : १०केआरडी०८
कॅप्शन : कऱ्हाडातील बसस्थानकात शनिवारी सर्व एसटी थांबून होत्या. प्रवासीच नसल्यामुळे बसस्थानकात पूर्णपणे शुकशुकाट जाणवत होता. (छाया : अरमान मुल्ला)
फोटो : १०केआरडी०९
कॅप्शन : कऱ्हाडचे प्रवेशद्वार असणाऱ्या कोल्हापूर नाक्यावर बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात होती. वैध कारणाशिवाय घराबाहेर पडलेल्या नागरिकांवर पोलिसांनी याठिकाणी कारवाई केली. (छाया : अरमान मुल्ला)