लॉकडाऊनच्या नियमांचे कडक पालन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:43 AM2021-05-25T04:43:23+5:302021-05-25T04:43:23+5:30
कातरखटाव : ‘गेल्या वर्षापासून खटाव तालुक्यातील जनता कोरोना महामारीच्या गंभीर परिणामाला सामोरे जात आहे. असे असताना लोकांमध्ये ...
कातरखटाव : ‘गेल्या वर्षापासून खटाव तालुक्यातील जनता कोरोना महामारीच्या गंभीर परिणामाला सामोरे जात आहे. असे असताना लोकांमध्ये गांभीर्य दिसून येत नाही. अजूनही अनेक जण नियमांचा भंग करून गर्दी करून विनामास्क फिरताना दिसत आहेत. अशा अतिउत्साही लोकांना व दुकानदारांना वेळेत अटकाव करून त्यांच्यावर धडक कारवाई करा’, अशा सूचना वडूज पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांनी ग्रामदक्षता समित्यांना दिले आहेत.
ज्या गावात दहापेक्षा जास्त रुग्ण आहेत, अशा हॉटस्पॉट कातरखटाव, पडळ, दातेवाडी, एनकूळ, बोबाळे या गावांना देशमुख यांनी भेटी देऊन सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी यांच्याशी कोरोना विषयावर चर्चा केली. सध्या ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक वाढत चालला असून, रोजच नवीन रुग्ण आढळून येत आहेत. तसेच अनेक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीस आला आहे.
बेफिकीर व टाइमपास म्हणून फिरणाऱ्यांमुळे कोरोना रुग्ण वाढायला लागले आहेत. अशा परिस्थितीमुळे एनकूळ, खातवळ, कनसेवाडी या खेड्यापाड्यांत टेस्ट मोहीम राबवण्यात आली असता २६५ रुग्ण पॉझिटिव्ह निघाले. त्यापैकी १५६ रुग्ण बरे झाले असले तरी १०९ रुग्ण ॲक्टिव्ह असून, यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, कोरोनाचा व्हायरस झपाट्याने वाढण्यास नागरिकांचा बेफिकीरपणा कारणीभूत ठरत असल्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे.
(कोट)
भागातील नागरिकांनी कातरखटाव बाजारपेठेत आल्यानंतर सोशल डिस्टन्स ठेवावा. दुकाने, पेठेत गर्दी करू नये, अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल.
-कांचन बोडके-बागल,
सरपंच, कातरखटाव
२४कातरखटाव
फोटो ओळ : कातरखटाव ग्रामपंचायतीला सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांनी सूचना केली. (छाया : विठ्ठल नलवडे)