जंबो कोविड सेंटरच्या सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन; वेतन थकवल्याने कर्मचारी आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:28 AM2021-05-28T04:28:37+5:302021-05-28T04:28:37+5:30
सातारा : गेल्या महिन्याचा पगार देण्यास उशीर झाल्याच्या निषेधार्थ जंबो कोविड सेंटरमधील कंत्राटी वाॅर्ड बाॅय व सफाई कामगारांनी काम ...
सातारा : गेल्या महिन्याचा पगार देण्यास उशीर झाल्याच्या निषेधार्थ जंबो कोविड सेंटरमधील कंत्राटी वाॅर्ड बाॅय व सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन केले. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दगड मारून एका गाडीची काच फोडल्याने काही काळ तणाव होता.
हा प्रकार बुधवारी रात्री उशिरा झाला. प्रशासनाने जंबो कोविड सेंटर कंत्राटदाराला चालवायला दिले आहे. या सेंटरवर सुमारे ४५ सफाई कामगार व वाॅडबाॅय काम करतात. मे महिना संपत आला तरी एप्रिल महिन्याचा पगार दिला गेला नाही, असा पोट कंत्राटदाराचा आरोप आहे. या कामगारांचे हातावर पोट आहे. वेळेवर पगार न मिळाल्याने हे कामगार अडचणीत आले आहेत. घरभाडे, कर्जाचे हप्ते थकले आहेत. वेळेवर पगार न मिळाल्यास खर्च भागविण्यासाठी कोठून पैसे आणायचे? असा सवालही या कामगारांनी माध्यमांशी बोलताना केला.
मुख्य ठेकेदारालाच काही तांत्रिक कारणामुळे देयके न मिळाल्याने सब ठेकेदारांच्या माध्यमातून मिळणारे वेतन कामगारांना न मिळाल्याची अडचण समोर आली. सफाई कर्मचाऱ्यांच्या काम बंदमुळे ‘जंबो’मध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते . रात्री उशिरापर्यंत जंबोचे व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यात चर्चा सुरू असल्याची माहिती होती .
व्यवस्थापकाची गाडी फोडल्याने तणाव
संतप्त सफाई कामगारांनी जंबो कोविड सेंटरच्या आवारात प्रशासनाचा तीव्र निषेध केला. याचवेळी रुग्णालय व्यवस्थापकाची गाडी पार्किंगमध्ये उभी होती. या गाडीची दर्शनी काच फोडण्याचा प्रकार झाल्याने पुन्हा तणाव वाढला. रुग्णालय व्यवस्थापनाची यंत्रणा व सफाई कर्मचारी यांच्यात जोरदार वादावादी झाली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांत प्रकरण गेले आहे.
__________________