ग्रामस्थांच्या तक्रारीनंतरही खडी फोडण्याचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 05:23 PM2017-07-24T17:23:52+5:302017-07-24T17:23:52+5:30
अधिकारीही येईनात : कामाच्या दजार्चे काय; बनपुरी-वडूज रस्ता
आॅनलाईन लोकमत
मायणी (जि. सातारा), दि. २४ : खटाव तालुक्यातील बनपुरी-येरळवाडी-वडूज या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाबाबत अनेक तक्रारी आहेत. असे असतानाही रस्त्याचे काम सुरू आहे. ऐन पावसामध्ये मुरुमीकरण व खडी फोडण्याचे काम सुरू असताना एकही अधिकारी या कामाचा दर्जा तपासणीसाठी येत नाही. त्यामुळे नेमके पाणी कोठे मुरत आहे, असा सवाल येरळवाडी व परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत.
बनपुरी, येरळवाडी ग्रामस्थांना कातरखटाव मार्गे वडूजला जावे लागत असल्यामुळे तेथील ग्रामस्थांचा वेळ व पैसा दोन्ही खर्च होत होते. म्हणून या मागार्साठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून वडूज, गणेशवाडी व बनपुरी या मागार्साठी निधी मंजूर करण्यात आला आहे. हे काम करताना प्रथम मातीकाम, खडीकरण करणे यासह अनेक स्तरांची माहिती येथील फलकावर लिहली आहे. पण खरेच या पद्धतीने काम होत आहे का, हे अधिकाऱ्यांनी वेळच्यावेळी पाहणे गरजेचे आहे. असे असताना अधिकारी काय करतात, हा प्रश्न आहे.
ग्रामस्थांनी तक्रार करूनही अधिकारी का येत नाहीत, या रस्त्याचे काम ऐन पावसाळ्यात सुरू झाले, मुरुमीकरण झालेल्या रस्त्यावर पावसामुळे ठिकठिकाणे खड्डे पडून त्याठिकाणी रस्ताही खचला आहे. या रस्त्यावरून दररोज ये-जा करणाऱ्या अनेक ग्रामस्थांनी अनेकवेळा ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तोंडी तक्रार केली आहे. तरीही या कामाकडे अधिकारी फिरकले नाहीत, अशी तक्रार ही ग्रामस्थ बोलून दाखवत आहेत. त्यामुळे नेमके पाणी मुरतंय कोठे हे काही कळेना, असे झाले आहे.
काही असो अशी कामे अनेक वर्षांतून मंजूर होतात. त्यासाठीही एकदाच निधी दिला जातो. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी या कामाच्या दजार्बाबत लक्ष देणे गरजेचे आहे. इतर तालुक्याच्या दृष्टीने खटाव तालुक्यातील रस्त्याची वाईट अवस्था आहे. रस्त्यावर खड्डा आला की खटाव तालुका आला, असे प्रवासी बोलतात. त्यामुळे रस्त्याचे काम चांगले होणे आवश्यक आहे. सध्या या रस्त्याबाबत ठेकेदाराची चूक आहे का? त्यावर लक्ष ठेवणाऱ्या संबंधित विभागाची हे कोडे उलगडत नाही. त्यामुळे याबाबत वरिष्ठांनीच लक्ष घालणे महत्त्वाचे ठरत आहे.
संबंधित ठेकेदाराने या रस्त्यावरील खडी बाजूला केली नाही तर येत्या दोन दिवसांत येरळवाडीतील युवकांच्या सहकायार्तून व ग्रामस्थांची मदत घेऊन खडी बाजूला करण्याचे काम हाती घेणार आहोत. त्यानंतर रस्ता पूर्ववत करून विद्यार्थ्यांची होणारी पायपीट थांबवणार आहे. राज्य परिवहन महामंडळाने एसटीची सेवा सुरू करावी, यासाठी विनंती करणार आहे.
- योगेश जाधव,
सामाजिक कार्यकर्ता, येरळवाडी