'राजे, आम्हाला तुम्ही हवे आहात'; अमोल कोल्हेंनंतर राजू शेट्टींचं साकडं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 01:42 PM2019-09-04T13:42:22+5:302019-09-04T14:02:20+5:30

भाजप प्रवेशाची काही दिवसांपासून लाट सुरू आहे. या परिस्थितीत उदयनराजेंसारखे जनसामान्यांत स्थान असलेले नेते भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेऊ लागले तर सर्वसामान्यांना कोणी वाली राहणार नाही.

For a strong democracy, leaders like Udayan Raje are in opposition: Raju Shetty | 'राजे, आम्हाला तुम्ही हवे आहात'; अमोल कोल्हेंनंतर राजू शेट्टींचं साकडं

'राजे, आम्हाला तुम्ही हवे आहात'; अमोल कोल्हेंनंतर राजू शेट्टींचं साकडं

googlenewsNext
ठळक मुद्देसुदृढ लोकशाहीसाठी उदयनराजेंसारखे नेते विरोधी पक्षात हवेत : राजू शेट्टी साताऱ्यात मनधरणीचा प्रयत्न; कुठलाही निर्णय घेतला नसल्याचे उदयनराजेंकडून स्पष्टीकरण

सातारा : सर्वसामान्य शेतकरी, कष्टकऱ्यांना सध्याच्या घडीला कोणी वालीच ठेवायचा नाही, असा प्रकार सुरू आहे. या परिस्थितीमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्यासारखे नेते विरोधी पक्षात टिकून राहायला हवेत, तरच लोकशाही सुदृढ राहील, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

सातारा येथील शासकीय विश्रामगृहावर खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी त्यांनी कमराबंद चर्चा केली, त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शेट्टी यांनी हे मत व्यक्त केले. मी लोकसभा निवडणुकीत पराभूत झालो, याचे उदयनराजेंना खूप वाईट वाटले. मला भेटून विविध विषयांवर चर्चा करायचीय, असे मतही त्यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केले होते.

आजच्या भेटीत संसदेतील अनुभव एकमेकांशी शेअर केले. काही दिवसांपासून उदयनराजेंविषयीच्या भाजप प्रवेशाबाबत उलट-सुलट बातम्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर मी उदयनराजेंशी चर्चा केली. भाजप प्रवेशाची काही दिवसांपासून लाट सुरू आहे. या परिस्थितीत उदयनराजेंसारखे जनसामान्यांत स्थान असलेले नेते भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेऊ लागले तर सर्वसामान्यांना कोणी वाली राहणार नाही. उदयनराजेंची विरोधी पक्षाला गरज आहे.

शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्न त्यांनी संसदेत ताकतीने मांडावेत. कुठलाही निर्णय घेताना जनसामान्यांचा विचार करावा, अशी विनंती उदयनराजेंकडे केली. त्यावर मी कुठलाही निर्णय अद्याप घेतलेला नाही, असे उदयनराजेंनी सांगितले.

ऊस नको भात लावा, असा सल्ला केंद्रातील मंत्री, अधिकारी शेतकऱ्यांना देताना काही दिवसांपूर्वी पाहायला मिळाले, याबाबत विचारले असता राजू शेट्टी म्हणाले, मला फ्रान्सच्या राणीने बोललेले वाक्य यानिमित्ताने आठवते. ब्रेड मिळत नसेल तर केक खा, असाच अनाहूत सल्ला ही मंडळी आपले अपयश झाकण्यासाठी देत आहेत.

 दरम्यान, विधानसभेला स्वाभिमानी शेतकरी पक्ष किती जागा लढविणार आहे? या प्रश्नाबाबत बोलताना किती जागा शिल्लक राहतात, ते बघून निर्णय घेतो, असेही शेट्टी म्हणाले. साखर कारखानदारच भाजपमध्ये जाऊन बसले आहेत. ज्यांनी शेतकऱ्यांची एफआरपी दिलीय ते आमच्यासोबत आहेत. तसेच ज्या भागातील शेतकऱ्यांची संघटनेला साथ मिळते, त्या ठिकाणच्या कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम दिली आहे, असंही शेट्टी यांनी सांगितले.

दरम्यान, या भेटीनंतर उदयनराजेंनी कुठलेही मत व्यक्त करण्यास स्पष्ट नकार दिला.उदयनराजेंसोबत झालेल्या चर्चेप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, राज्य संघटक अर्जुनराव साळुंखे, प्रवक्ते अनिल पवार, सुनील काटकर आदी उपस्थित होते.

सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स हे तर भाजपचे कार्यकर्ते

सीबीआय, ईडी आणि इन्कम टॅक्स या केंद्रातील संस्था याच भाजपच्या कार्यकर्त्या बनल्या आहेत. त्याचा वापर करून विरोध करणाऱ्यांना पिडा देण्याचे काम सुरू आहे. या संस्थांना सर्वसामान्यांचा आक्रोश दिसत नाही. सहकारी साखर कारखान्यांचे खासगीकरण करताना जो आर्थिक गैरव्यवहार झाला आहे, तो या संस्थांना का दिसत नाही?

बबनराव पाचपुते, दिलीप सोपल, तानाची सावंत, दिलीप गावित, सुभाष देशमुख या नेत्यांनी गैरव्यवहार केलेले भाजपप्रणित या संस्थांना चालते; मात्र भाजपला विरोध करणाऱ्यांच्या मागे या संस्था हात धुवून मागे लागत आहेत, अशी टीकाही राजू शेट्टी यांनी यावेळी केली.

Web Title: For a strong democracy, leaders like Udayan Raje are in opposition: Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.