सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात दमदार पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 11:02 PM2018-06-21T23:02:26+5:302018-06-21T23:02:26+5:30
सातारा : जिल्ह्याच्या पूर्व भागात बुधवारपासून पाऊस होत असून, गुरुवारीही अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली, तर धरण परिसरातही पावसाने जोर धरण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात १६३.४ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
यावर्षी मान्सूनचा पाऊस वेळेत सुरू झाला. त्यामुळे आनंदाचे वातावरण असतानाच मध्येच पावसाने काही दिवस दडी मारली. यामुळे शेतकऱ्यांपुढे पेरणीचा प्रश्न निर्माण झाला. पाऊस होणार की नाही, या चिंतेत असतानाच बुधवारपासून पाऊस सुरू झाला आहे. पूर्व भागातील फलटण, माण, खटाव, कोरेगाव तालुक्यांत पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. गुरुवारीही माण तालुक्यातील अनेक गावांत हजेरी लावली. सर्वाधिक दहिवडी मंडलात १५ मिलीमीटर पाऊस
झाला. तसेच वॉटर कप स्पर्धेंतर्गत
काम झालेल्या ठिकाणीही पाणीसाठा झाला आहे. खटाव तालुक्यांतील औंध परिसरात चांगला पाऊस झाल्याने शेतकºयांत आनंदाचे वातावरण आहे. कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसराला बुधवारी रात्रीच्या सुमारास पावसाने झोडपले.
यामुळे ओढे भरून वाहू लागले आहेत. गुरुवारीही येथे पाऊस झाला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. सातारा तालुक्यातील अंगापूर परिसरात पाऊस झाल्याने पिकांचे पाणी वाचले आहे. फलटण तालुक्यातील आदर्की भागातही सलग दुसºया दिवशी पाऊस झाला.
सातारा शहरातही हजेरी
सातारा शहरासह परिसरात दोन दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. यामुळे सर्वत्र पाणी दिसत आहे. या पावसामुळे शहरातील वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकारही घडला.