स्वाभिमानी अन् साविआत ‘शिटी’साठी जोरदार संघर्ष
By Admin | Published: February 7, 2017 11:08 PM2017-02-07T23:08:35+5:302017-02-07T23:08:35+5:30
आठ अर्ज बाद : सातारा तालुक्यातून २२८ उमेदवार रिंगणात
सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सातारा तालुक्यात अर्ज दाखल केलेल्या २८८ उमेदवारांपैकी ८ उमेदवारी अर्ज छाननीत अवैध ठरले. आता जिल्हा परिषदेसाठी ८० उमेदवार तर पंचायत समितीसाठी १५५ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. दरम्यान, सातारा तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीत ‘शिटी’ चिन्हासाठी संघर्ष निर्माण झाला आहे.
तासगाव गणातील राष्ट्रवादीच्या उमेदवार माधवी गवळी यांचा अर्ज अवैध ठरल्याने त्यांच्या जागी अपक्ष उमेदवार रेश्मा प्रवीण बोभाटे यांना पुरस्कृत म्हणून निवडले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी दिली. सातारा तालुक्यातून दाखल झालेल्या २८८ उमेदवारी अर्जांची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती देशमुख यांच्या उपस्थितीत मंगळवारी तहसील कार्यालयात पार पडली. छाननीसाठी तालुक्यातून उमेदवार, सूचक व कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती.
गोडोली गटातून सुजाता पाटोळे यांच्या अर्जावर सही नसल्याने
त्यांचा जिल्हा परिषदेच्या गटासाठी असलेला एकमेव अर्ज अवैध ठरला. तासगाव गणातून रेखा कांबळे यांचा अर्ज शपथपत्रावर सही नसल्याने अवैध ठरला. माधवी गवळी यांचा अर्ज जातपडताळणी प्रस्तावाची पोच नसल्याने अवैध ठरला. संभाजीनगर (कोडोली) गणात प्रिती पाटील यांचा अर्ज जातपडताळणीची पोच नसल्याने अवैध ठरला. दरे खुर्द गणात सुधीर पवार यांनी मूळ जातीचा दाखला सादर न केल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरला. शेंद्रे गणात नलिनी पवार यांनी जातपडताळणी प्रमाणपत्र पोच न दिल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरला. नागठाणे गणात जयश्री दळवी यांचा अर्ज जातपडताळणी प्रस्तावाची पोच नसल्याने अवैध ठरला. (प्रतिनिधी)