जिल्ह्यात वळवाची जोरदार हजेरी; गारपिटीने दणका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:41 AM2021-04-27T04:41:05+5:302021-04-27T04:41:05+5:30

सातारा : जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असतानाच सोमवारी दुपारनंतर अनेक ठिकाणी वळवाचा जोरदार पाऊस झाला. यामुळे वातावरण थंड झाले. ...

Strong turnout in the district; Hit by hail! | जिल्ह्यात वळवाची जोरदार हजेरी; गारपिटीने दणका !

जिल्ह्यात वळवाची जोरदार हजेरी; गारपिटीने दणका !

Next

सातारा : जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असतानाच सोमवारी दुपारनंतर अनेक ठिकाणी वळवाचा जोरदार पाऊस झाला. यामुळे वातावरण थंड झाले. तर साताऱ्यासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी गारा पडल्या. या गारांमुळे फळबागांना दणका बसला. दरम्यान, फलटण, कोरेगाव, वाई तालुक्यात पाऊस आणि गारपीट झाली.

जिल्ह्यात १५ दिवसांपूर्वी वळवाचा पाऊस पडला होता. तसेच खटाव आणि कोरेगाव तालुक्यात मोठी गारपीट झाली होती. यामुळे पिकांचे आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. तर पावसामुळे उकाडा कमी झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, गेल्या पाच-सहा दिवसांपासून उन्हाची तीव्रता पुन्हा वाढली होती. साताऱ्यात तर कमाल तापमान ३८ अंशापर्यंत गेले होते. जिल्ह्याच्या दुष्काळी माण, खटाव तालुक्यांतील कमाल तापमान तर ४० अंशापर्यंत गेले होते. यामुळे नागरिकांसह जनावरांनाही उन्हाच्या तीव्रतेचा सामना करावा लागला. असे असतानाच सोमवारी मात्र, काही भागांतील लोकांची उकाड्यापासून सुटका झाली. वळवाचा पाऊस आणि काही ठिकाणी गाराही पडल्या.

सातारा शहरात सोमवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे पाऊस पडेल अशी चिन्हे दिसत होती. सायंकाळी साडेचारनंतर ढगांच्या गडगडाटात पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला दहा मिनिटे पाऊस हळूहळू सुरू होता. त्यानंतर पुन्हा जोरदार धारा पडू लागल्या. त्याचबरोबर गारा पडण्यास सुरुवात झाली. यामुळे पत्र्याच्या घरावर धडधड आवाज सुरू झाला. यामुळे सातारकर कुतूहलाने गारा पडताना पाहत होते. काही नागरिकांनी तर गारा वेचून खाण्याचा आनंद घेतला. जवळपास २० मिनिटे पाऊस पडत होता. तर यादरम्यान ऊनही पडले होते. ऊन-पावसाचा खेळ रंगला होता. या पावसामुळे उकाडा कमी झाला आहे.

फलटण शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. फलटण शहरात तर जोरदार पावसामुळे रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहत होते. काही घरातही पाणी शिरले. यामुळे नुकसान झाले. तर वीज गेल्याने अंधार पसरला होता. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील देऊर, वाठार स्टेशन परिसरातही पावसासह गारा पडल्या. त्याचबरोबर वाई तालुक्यातील वेळे परिसरातही गारांसह पाऊस पडला. दरम्यान, पाऊस आणि गारपिटीमुळे मका, टोमॅटोसह द्राक्ष, डाळिंब बागांना मोठा फटका बसला आहे.

फोटो २६सातारा रेन नावाने...

फोटो ओळ : सातारा शहरात पाऊस आणि गारा पडल्या. यावेळी छत्रीत गारा पकडून खाण्याचा आनंदही नागरिकांनी घेतला.

............................................................................

Web Title: Strong turnout in the district; Hit by hail!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.