आजोबांचे दातृत्व जपण्यासाठी नातवांची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:41 AM2021-05-27T04:41:52+5:302021-05-27T04:41:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : विलासपूर येथील मयूर आणि अरिंजय या दोन छोट्या भावांनी आजोबांचे दातृत्व जपण्यासाठी रस्त्यावर येऊन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : विलासपूर येथील मयूर आणि अरिंजय या दोन छोट्या भावांनी आजोबांचे दातृत्व जपण्यासाठी रस्त्यावर येऊन गरजूंना मदतीचा हात दिला.
दिवंगत लक्ष्मणराव नाना महामुलकर यांच्या आठवणी जागवण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रम आणि खर्चास फाटा देत वडिलांची समाजाप्रति असलेली दातृत्वाची शिकवण पुढे नेण्याच्या विचाराने ज्ञानेश्वर आणि बाळासाहेब महामुलकर यांनी सातारा शहरात कोरोनाच्या संकटात गोडोली येथे कोरोना रुग्णांसाठी सुरू करण्यात आलेल्या श्री साई आयसोलेशन सेंटर व विसावा नाका येथील पुष्कर कोविड केअर सेंटरमधील सर्व रुग्णांना आरोग्यवर्धक काढा पावडर, घरातील पोळीभाजीचे फूड पॅकेट, पाणी बॉटल, सॅनिटायझर आणि एन-९५ मास्क दिले.
याबरोबरच या संकटात आपला जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या रिक्षाचालकांना, भाजी-फळे विक्रेत्यांना, घंटागाडी कर्मचारी, एमआयडीसीतील मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालक, सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केले.
पूरपरिस्थितीत आणि मागील वर्षी आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेतसुद्धा समाजासाठी काही ना काही मदत करण्याचा पायंडा पुढे चालू ठेवून आजोबांच्या प्रति असलेली आपुलकी म्हणून त्यांचे नातू मयूर महामुलकर आणि अरिंजय महामुलकर या बंधूंनी पुढे होऊन या मदतीचे वाटप केले. या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले.
फोटो ओळ : सातारा येथे महामुलकर कुटुंबीयांच्या वतीने वाहतूक पोलिसांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.