पदांचा संघर्ष अडकला ‘यात्रेत’ !
By Admin | Published: March 31, 2017 11:01 PM2017-03-31T23:01:02+5:302017-03-31T23:01:02+5:30
जिल्ह्यातील सारेच नेते विदर्भात : सभाप्तिपदांची घोषणा अमरावतीतून केली जाणार
सातारा : ‘जिल्हा परिषदेतील सभापती पदांच्या नावाची घोषणा शनिवारी सकाळी १० वाजता केली जाणार आहे. कारण जिह्यातील राष्ट्रवादीचे सारेच नेते विदर्भातील संघर्ष यात्रेत अडकले आहेत. अजित पवारांशी चर्चा झाल्यानंतर आमदार शशिकांत शिंदे दूरध्वनीवरून नावांची घोषणा करतील,’ अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी दिली.
जिल्हा परिषदेतील विषय समित्यांच्या सभापती निवडीकडे जिल्ह्याच्या नजरा लागल्या आहेत. अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी जितकी उत्सुकता होती, तितकीच सभापती निवडीचीही उत्सुकता ताणली गेली आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे ६४ पैकी ४० सदस्य निवडून आले आहेत. सभापती निवडी १ एप्रिल रोजी आहेत. २गुरुवारीही मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते तालुक्यांचा ‘बॅलन्स’ कसा साधतात याची उत्सुकता आहे.
सर्व आमदार मंडळी काही दिवसांपासून चंद्रपूर येथून निघालेल्या संघर्ष यात्रेत सहभागी झाले असल्याने इच्छुकांची गोची झाली आहे. काहींनी सुरुवातीला नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्वजण संघर्ष यात्रेत आहेत, हे लक्षात आल्यानंतर फोनाफोनी बंद झाली.
जिल्हा परिषदेतील शिक्षण व अर्थ, कृषी, समाजकल्याण तसेच महिला व बालकल्याण या चार समित्यांचे सभापती निवडीच्या हालचाली सध्या गतिमान आहेत. महिला व बालकल्याण समितीवर दिवंगत आमदार सदाशिवराव पोळ यांच्या स्नुषा भारती पोळ यांना संधी देण्याबाबत राष्ट्रवादीच्या सर्वच नेतेमंडळींचे एकमत झाले आहे.
परंतु इतर तीन समित्यांसाठी वाई, कोरेगाव, कऱ्हाड, पाटण या मतदार संघांतील आमदारांनी जोर लावला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागच्या मंगळवारी जिल्ह्यातील आमदारांची मुंबईत बैठक घेतली होती. १२ सदस्यांना आपण सभापतिपदांवर संधी देऊ शकतो, याचा पुनरुच्चार आमदार पवार यांनी या बैठकीत केला होता. फलटणला अध्यक्षपद, सातारा-जावळीला उपाध्यक्षपद मिळाले असल्याने या दोन तालुक्यांतून नेत्यांचा आग्रह थांबला आहे. माण तालुक्यालाही सभापतिपद मिळणार आहे. मात्र, कऱ्हाड, वाई, कोरेगाव, पाटण या मतदार संघांनाही संधी देण्यासाठी आमदार मंडळी या बैठकीत आग्रही राहिले होते. शनिवारी होणाऱ्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले
आहे. (प्रतिनिधी)