सातारा तालुक्यात वर्चस्वासाठी संघर्ष!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:32 AM2021-01-14T04:32:54+5:302021-01-14T04:32:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा तालुक्यातील १३0 ग्रामपंचायतीची निवडणूक लागली. त्यातील ४0 ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात नेत्यांना यश आले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा तालुक्यातील १३0 ग्रामपंचायतीची निवडणूक लागली. त्यातील ४0 ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात नेत्यांना यश आले असले तरी ९0 ग्रामपंचायतींत काँटे की टक्कर सुरू आहे. तालुक्यावरील वर्चस्वासाठी दोन राजेंचे गट कसोशीने प्रयत्न करताना दिसत आहेत. या निवडणुकीतील यशापयशावरच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीची गणिते ठरणार आहेत.
आगामी नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीला विशेष महत्त्व आहे. खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे गट वर्चस्वासाठी झुंजताना दिसत आहेत. दोन्ही राजे एकाच पक्षात असतानादेखील तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या झुंजी सुरू असल्याचे चित्र आहे.
तालुक्यातील खेड या ग्रामपंचायतीत माजी सभापती मिलिंद कदम यांचा गट सत्ता कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. शेंद्रे ग्रामपंचायतीमध्ये आप्पा पडवळ व सुनील काटकर यांना मानणारे गट सत्ता मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. परळी गटात माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले यांचा गट झुंजताना दिसतो आहे. बोरगाव, वर्ये, वेळे, नागठाणे, पाडळी, नुने, कोडोली, अंगापूर वंदन, संगममाहुली, नांदगाव, शिवथर, सैदापूर, किडगाव या ग्रामपंचायतीतदेखील दोन्ही राजेंचे गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
कोडोली ग्रामपंचायतीमध्ये आमदार शशिकांत शिंदे व आमदार महेश शिंदे यांना मानणा-या कार्यकर्त्यांमध्ये उभा संघर्ष सुरू आहे. तासगाव ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव यांनी स्वतंत्र पॅनेल उभे केले आहे. शिवथर ग्रामपंचायतीमध्ये माजी कृषी सभापती किरण साबळे-पाटील यांच्या गटाविरोधात भाजपने उमेदवार उभे केले आहेत. आगामी विकास सेवा सोसायट्या, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून या ग्रामपंचायत निवडणुकीकडे पाहिले जाते.
४0 ग्रामपंचायती बिनविरोध
सातारा तालुक्यातील जांभळेवाडी, समर्थनगर, आष्टे, आलवडी, धावली, सायळी, विजयनगर, कामर्थी तर्फ सातारा, अटाळी सावली, गणेशवाडी, कोंदणी नरेवाडी, शेरेवाडी, भाटमरळी, भरतगाव, पिंपळवाडी, जोतीबाचीवाडी, कुशी, आंबवडे बुद्रुक, मस्करवाडी, कुस बु., रामकृष्णनगर, शिवाजीनगर, कुमठे, धनवडेवाडी, पाटेश्वरनगर, लिंबाचीवाडी, जाधववाडी, देवकल पारंबे, चाळकेवाडी, कुरुण, कुस खु., रोहोट, कुरुलबाजी, झरेवाडी, चिंचणी, अंगापूर तर्फ तारगाव, परमाळे, चिंचणी पुनर्वसित, बनघर या ४0 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.