वनसंपदा जगविण्यासाठी धडपड, सोनजाई डोंगरावरील झाडांचे पर्यावरणप्रेमींकडून संवर्धन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 05:09 PM2022-04-12T17:09:17+5:302022-04-12T17:09:35+5:30
पांडुरंग भिलारे वाई : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पाण्याचे दुर्भिक्ष सर्वत्र जाणवू लागले आहे. एका बाजूला वणवे ...
पांडुरंग भिलारे
वाई : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पाण्याचे दुर्भिक्ष सर्वत्र जाणवू लागले आहे. एका बाजूला वणवे लावून डोंगर काळेकुट्ट करणारी अपप्रवृत्ती, तर दुसऱ्या बाजूला पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी खारीचा वाटा उचलणारे पर्यावरणप्रेमी आढळत आहेत. सोनजाई डोंगरात दररोज सकाळी फिरायला जाणारे झाडांना पाणी घालत आहेत.
पर्यावरणाचे चक्र संतुलित चालण्यासाठी वृक्ष, पशुपक्षी, कीटक, सूक्ष्मजीव यांचे अस्तित्व महत्त्वाचे असते. प्राण्यांच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गांवर आहेत. याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असून, त्यांचे भीषण दुष्परिणाम दिसू लागले आहेत. पर्यावरणाचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. वाईजवळील सोनजाईच्या डोंगरात मॉर्निंग वॉकला जाणारे नागरिक, दाम्पत्य यांनी वृक्षारोपण, संरक्षण व नियमित पाणी देण्याचा विडा उचलला आहे. याचबरोबर सोनजाईदेवी रस्ता परिसरात पक्षांसाठी पाण्याच्या कुंड्या ही लावण्यात आल्या आहेत.
पावसाळ्यात या परिसरात वाई रोटरी क्लबतर्फे ७० रोपे लावली असल्याची माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष दीपक बागडे यांनी दिली. वाई येथील व्यावसायिक संदीप घोरपडे, महेश पिसाळ, विमा विकास अधिकारी चंद्रशेखर घोणे यांनी सहकार्य करून जातिवंत रोपे लावून झाडांना संरक्षण केले आहे. यांच्यासह नायब तहसीलदार वैशाली घोरपडे, अजित क्षीरसागर, अनिता क्षीरसागर, धनंजय घोडके हे नियमित वृक्षांना व पक्षांसाठी कुंड्या मध्ये पाणी घालण्याचे विधायक काम करत असतात.