एसटीची एका दिवसात ‘कोटीची दिवाळी’
By admin | Published: October 28, 2014 11:50 PM2014-10-28T23:50:16+5:302014-10-29T00:11:35+5:30
सातारा विभाग : उत्कृष्ट नियोजनाच्या जोरात राज्यात अव्वल
सातारा : ‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ हे वाक्य एसटीसाठी तंतोतंत जुळत आहे. एरव्ही लाल डबा, तोट्यातील महामंडळ म्हणून हिनवल्या जात असलेल्या एसटीच्या सातारा विभागाने सोमवार, दि. २७ रोजी विक्रमी उत्पन्न मिळविले आहे. विभागाने १ कोटी ९ लाखांची दिवाळी साजरी करुन राज्यात अव्वल क्रमांक मिळविला आहे.
दिवाळी सण आपल्या रक्तातील माणसांमध्ये साजरा करता यावा, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यादृष्टीने तो नियोजनही करत असतो. दिवाळीची शासकीय सुटी दोन दिवसांची असली तरी सलग सुट्या जोडून आल्याने चार दिवसांची सुटी घेता आली. त्यामुळे नोकरदार मंडळींसाठी दुग्ध शर्करेचा योग होता. याचाच फायदा घेऊन लोकांनी मनसोक्त फिरण्याचा आनंद घेतला. दिवाळीतील दोन दिवस स्वत:च्या गावी, दोन दिवस सासरवाडी अन् भाऊबीज बहिणीकडे साजरी केली.
प्रत्येकाला इच्छित स्थळी पोहोचता यावे, यासाठी एसटी अहोरात्र धडपडत होती. सातारचे विभाग नियंत्रक धनाजी थोरात यांच्या मार्गदर्शनासाठी जिल्ह्यातील अकरा आगारातील अधिकारी, कर्मचारी, निरीक्षक, चालक-वाहक रात्रीचा दिवस करुन सेवा बजावत होते.
जिल्ह्यातील हजारो तरुण शिक्षण, व्यावसाय, नोकरीच्या निमित्ताने पुणे, मुंबईला स्थायीक झाले आहेत. ते दर दिवाळीला सातारा जिल्ह्यात मुळगावी येत असतात. याचा अभ्यास करुन दिवाळीपूर्वी पुणे, मुंबईला जादा गाड्या सोडून सातारकरांना मुळगावी आणण्याचे काम केले. भाऊबीजेला बहिण-भावाला जवळ आणण्याचे काम एसटी महामंडळाने केले आहे. यासाठी जादा गाड्या सोडल्या. यामुळे संपूर्ण दिवाळीत एसटीने जादा
गाड्या सोडल्याने प्रवाशांची सोय झाली.
दिवाळीसाठी प्रत्येकजण सोयीनुसार सुटी मिळेल तेव्हा सातारा जिल्ह्यात आला. मात्र, शनिवारी भाऊबीजनंतर रविवारी साप्ताहिक सुटी संपल्यानंतर सोमवारी प्रत्येक जण कामावर हजर होण्यासाठी परतीच्या प्रवासाला लागला होता.
त्यामुळे संभाव्य गर्दीचा अंदाज घेऊन सातारा विभागाने राज्यातील अर्धा तासाला सातारा-पुणे, वीस मिनिटांना सातारा-मुंबई विनाथांबा गाड्या सोडल्या. त्यानंतरही आवश्यकतेनुसार जादा गाड्या सोडल्या जात होत्या. यामुळे सोमवारी एका दिवसात तब्बल १ कोटी ९ लाखांचे उत्पन्न मिळविले आहे. (प्रतिनिधी)
आगारउत्पन्न लाखा
सातारा१९.४२
कऱ्हाड १२.७९
कोरेगाव८.०८
फलटण१४.२४
वाई११.४६
पाटण९.२२
दहिवडी७.०९
महाबळेश्वर६.२८