Satara: एसटीच्या चाकाखाली सापडून विद्यार्थिनी ठार, गाडीत बसताना वाई स्थानकात घडली दुर्दैवी घटना
By दत्ता यादव | Published: August 12, 2023 04:11 PM2023-08-12T16:11:03+5:302023-08-12T16:14:23+5:30
एसटी चालकास वाई पोलिसांनी घेतले ताब्यात
सातारा : वाई येथील स्थानकात एसटीच्या चाकाखाली सापडून एका १३ वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. श्रावणी विकास आयवळे (वय १३, रा. सुलतानपूर, ता. वाई) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. वाईमधील जोशी विद्यालयात ती ७ वी मध्ये शिकत होती. हा अपघात आज, शनिवारी दुपारच्या सुमारास झाला. अपघातानंतर बसस्थानकात एकच खळबळ उडाली.
याबाबत अधिक माहिती अशी, वाई बालेघर एसटी (एमएच १४ बीटी ०४९६) बसस्थानकातील फलाटावर लागत असताना गाडीमध्ये शिरण्यासाठी विद्यार्थ्यांची एकच गर्दी झाली होती. यावेळी श्रावणी आयवळे ही विद्यार्थिनी एसटीच्या मागच्या बाजूस पडली. एसटी मागे येत असल्याने तिचे डोके एसटीच्या चाकाखाली चिरडले. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर बसस्थानकात प्रचंड खळबळ उडाली.
या घटनेची माहिती मिळताच परिविक्षाधीन सहायक पोलिस अधीक्षक कमलेश मीना, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे, कृष्णकांत पवार व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. एसटी चालक जीवन मारुती भोसले (वय ३६, नांदवळ) याला वाई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.