विद्यार्थ्याकडे आढळले पिस्तूल
By admin | Published: October 16, 2015 11:22 PM2015-10-16T23:22:57+5:302015-10-16T23:24:04+5:30
कऱ्हाडात कारवाई : पिस्तूलसह जिवंत काडतुसे, मॅगझिन हस्तगत
कऱ्हाड : महाविद्यालयात शास्त्र शाखेच्या पहिल्या वर्षामध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलाकडून पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे हस्तगत केली. सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेने सैदापूर (ता. कऱ्हाड) येथे महाविद्यालय परिसरात ही कारवाई केली. संबंधित मुलाकडून विक्रीच्या उद्देशाने आणलेले पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे असा ८१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाड येथील महाविद्यालय परिसरात एकजण पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती शुक्रवारी सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली. घनवट यांनी या माहितीची खातरजमा करून पथकाला सापळा रचण्याची सूचना केली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक शुक्रवारी सकाळीच महाविद्यालय परिसरात दाखल झाले. सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आयटीआय चौकातील लक्ष्मी भवन हॉटेलसमोर हे पथक दबा धरून बसले. त्यावेळी एक अल्पवयीन मुलगा रस्त्यावर संशयास्पदरीत्या फिरताना दिसला. पोलीस पथकाने त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले. हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे पोलिसांनी त्या मुलाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. त्यावेळी मुलाने उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे विक्रीच्या उद्देशाने आणलेले सुमारे ७५ हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे एक पिस्तूल, सुमारे एक हजार ५०० रुपये किमतीची तीन जिवंत काडतुसे, एक हजार रुपये किमतीचा मोबाईल, तीन हजार ५०० रुपये किमतीचे एक आयताकृती मॅगझिन असा सुमारे ८१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला. शस्त्रबंदी आदेशाचा भंग करून विनापरवाना पिस्तूल व काडतुसे बाळगल्याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे. (प्रतिनिधी)
मूळचा बहुले गावचा !
पोलिसांनी ताब्यात घेतलेला संबंधित मुलगा विद्यानगर येथील एका महाविद्यालयात शास्त्र शाखेमध्ये पहिल्या वर्षात शिक्षण घेत असल्याची माहिती समोर येत आहे.
तो कऱ्हाड तालुक्यातील बहुले गावचा असून, गत काही दिवसांपासून ते पिस्तूल त्याच्याकडे होते. काही मुलांसमोर हातात पिस्तूल घेऊन ‘शायनिंग’ करण्याचाही त्याने प्रयत्न केल्याचे पोलीस तपासात उघड होत आहे.