दहावीत ७७ टक्के मार्कस् मिळूनही विद्यार्थिनीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 05:00 PM2019-06-15T17:00:38+5:302019-06-15T17:05:21+5:30
सातारा : दहावीच्या परीक्षेत ७७ टक्के मार्कस् मिळूनही स्नेहल माणिक गवळी (वय १६, रा. गुरुवार पेठ, सातारा) या विद्यार्थिनीने ...
सातारा : दहावीच्या परीक्षेत ७७ टक्के मार्कस् मिळूनही स्नेहल माणिक गवळी (वय १६, रा. गुरुवार पेठ, सातारा) या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे यापेक्षाही तिला अधिक मार्कस्ची अपेक्षा होती. ही घटना गुरुवार, दि. १३ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्नेहल गवळी ही साताऱ्यातील एका शाळेत दहावीमध्ये शिकत होती. सात दिवसांपूर्वी दहावीचा निकाल लागला. त्यावेळी तिला ७७ टक्के मार्कस् मिळाले. मात्र, तिला यापेक्षाही अधिक मार्कस् मिळतील, अशी अपेक्षा होती. त्यामुळे निकाल लागल्यापासून ती नाराज होती. या नैराश्यातून तिने गुरुवारी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार घरातल्यांच्या निदर्शनास आल्यानंतर तिला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. तत्पूर्वीच स्नेहलचा मृत्यू झाला होता.
७७ टक्के चांगले मार्कस् असतानाही स्नेहलने टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.