आजी सतत अभ्यास कर म्हणतेय म्हणून सहावीतील विद्यार्थ्यांने सोडले घर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 08:40 PM2019-12-15T20:40:29+5:302019-12-15T20:44:17+5:30
आजी सतत अभ्यास करण्याचा सल्ला देत असल्यामुळे तो वैतागला होता.
सातारा - ‘आजी सतत अभ्यास कर,’ असे म्हणते म्हणून सहावीतील एका मुलाने साताऱ्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. सातारा बसस्थानक प्रमुख व पोलिसांनी त्याचे समुपदेशन केले. त्यानंतर त्याला नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. संबंधित मुलाने यापूर्वीही आपल्या आईला आत्महत्या करण्याची धमकी दिली होती, असे पोलिसांनी सांगितले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साताऱ्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये बारा वर्षांचा मुलगा एका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत आहे. त्याचे आई-वडील मुंबई येथे राहतात. तर तो सातारा येथे आपल्या आजीकडे राहतो. आजी त्याला सतत अभ्यास करण्याचा सल्ला देत असल्यामुळे सततच्या सल्ल्याला तो वैतागला होता. अभ्यास केला नाही तर कधी कधी त्याला आजी मारही देत असत. तो चांगला शिकावा यासाठी त्याच्या आजीने त्याला साताऱ्यातील एका इंग्लिश मीडियममध्ये एक लाख रुपये फी भरून दाखल केले होते. पुढे खर्च परवडत नसल्याने त्याला दुसºया एका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दाखल केले होते. दरम्यान, शनिवारी सकाळची शाळा सुटल्यानंतर आजीने दिलेले पंधरा रुपये घेऊन तो औद्योगिक वसाहतीतून रिक्षाने बसस्थानकात आला. मात्र तेथील गर्दी पाहून त्याला रडू कोसळले. रडतच तो सातारा बसस्थानक प्रमुख सय्यद यांच्या कार्यालयात गेला.
सय्यद यांनी त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने आपण घरातून पळून आल्याची माहिती दिली. या घटनेचे गांभीर्य ओळखून सय्यद यांनी सातारा बसस्थानकातील पोलीस चौकीत कार्यरत असणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पवार, दत्ता पवार यांना या घटनेची माहिती दिली. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी सय्यद यांच्या कार्यालयात जाऊन त्याची विचारपूस करून साधारण दोन तास त्याचे समुपदेशन केले. त्यानंतर त्याला त्याच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.
कुठंतरी जायचं..पण घरात नाय थांबायचं!
संबंधित अल्पवयीन मुलाकडे पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर त्याने सांगितलेली माहिती ऐकून पोलीस अवाक् झाले. कुठंतरी जाणार होतो; पण मला घरात थांबायचं नव्हतं. पण तू कुठे जाणार होता, असे पोलिसांनी विचारल्यानंतर त्याने बस जाईल तिकडे जाणार होतो, असे उत्तर दिले.