शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची दररोज पायपीट
By admin | Published: September 5, 2014 09:30 PM2014-09-05T21:30:26+5:302014-09-05T23:22:54+5:30
पास मोफत; पण एस. टी. कुठाय ?.. ढेबेवाडी विभाग : गावोगावी माध्यमिक शिक्षण सुविधेची गरज
सणबूर : परीसरातील डोंगराळ भागातील गावोगावी आणी वाड्यावस्त्यांवर प्राथमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली असली तरी माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणाचे जाळे मात्र त्या तुलनेत आजही विणले गेलेले नाही. शिक्षणासाठी अजूनही येथील विद्यार्थ्यांच्या नशिबी पायपिट कायम आहे. ऊन्हाळा, पावसाळा असो की हिवाळा. दररोज पाच ते दहा कि़ मी. पायपीट विद्यार्थ्यांना चुकलेली नाही.विभागातील दुर्गम डोंगराळ भागात स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक वर्ष मुलभूत सुविधांची कमतरता कायम राहिली. भौगोलीक अडचणींमुळे अनेक वर्ष जनतेच्या नशिबी वनवास आला. सध्या डोंगरवासीयांच्या गावात विकासाची पहाट होत आहे. रस्त्याबरोबरच इतर सुविधाही पोहोचू लागल्या आहेत. मात्र, शिक्षणाची परीपुर्ण सुविधा पोहोचायला अजून किती पिढ्या जातील, हे सांगणे तुर्त तरी कठीण आहे. प्राथमिक शिक्षणाची सुविधा गावोगावी आणि वाड्यावस्त्यांवर पोहोचली असली तरी माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणाची सोय अजुनही झालेली नाही. डोंगरभागात गावे आणि वाड्यावस्त्या विखरून आहेत. माध्यमिक विद्यालयांची संख्या मर्यादीत असल्याने अनेक विद्यार्थ्यांना पायपीट करण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही.
विभागातील निवी, कसणी, वरचे घोटील, आंब्रुळकरवाडी, सातर, निगडे आदी गावातील विद्यार्थी दररोज पायपीट करून माध्यमिक विद्यालयांमध्ये शिक्षणासाठी जातात. अन्य ठिकाणच्या आणि सपाटीच्या काही गावातील विद्यार्थ्यांची स्थितीही त्यापेक्षा वेगळी नाही. बऱ्याच गावात एस. टी. ची सुविधा नसल्याने विद्यार्थी चालतच विद्यालयांमध्ये जातात. काहींच्या नशिबी १५ ते २० कि़ मी. ची पायपीट कायम आहे. काही गावांचा शाळेकडे जाण्याचा मार्ग ओढे आणी नद्यांतून असल्याने पावसाळ्यात या विद्यार्थ्यांच्या शाळेतील उपस्थितीवर परिणाम जाणवतो. (वार्ताहर)
पास मोफत; पण एस. टी. कुठाय ?
या भागातील मुलांबरोबरच मुलीही आता शाळा, महाविद्यालयात शिकु लागल आहेत. मात्र, शिक्षणासाठी हे विद्यार्थी उपसत असलेले कष्ट मोठे आहे. शासनाने अहिल्यादेवी होळकर योजनेद्वारे पाचवी ते दहावीच्या विद्यार्थीनींसाठी एस.टी.च्या मोफत पासची सोय केली आहे. मात्र, अनेक गावांनी एस. टी. चे तोंडच पाहिले नसल्यामुळे मोफत पास मिळूनही विद्यार्थीनींना त्याचा फायदा नाही. त्यामुळे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींची संख्या हजारच्या घरात असली तरी फक्त दोनशे ते अडीचशे विद्यार्थीनीच पासचा लाभ घेत आहेत.