विद्यार्थ्यांची कोंडी : शुल्क वसुलीसाठी खासगी शाळांचा छुपा अजेंडा..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 11:12 AM2020-05-31T11:12:35+5:302020-05-31T11:14:17+5:30
बेताची आर्थिक स्थिती असलेले पालक तीन महिन्यांची फी एकत्र भरण्याचा पर्याय निवडतात. सध्या नोकरीच्या ठिकाणी पगारांमध्ये झालेली कपात लक्षात घेता पालकांना ही फी भरणं शक्य नाही.
सातारा : राज्याच्या शालेय शिक्षण मंत्र्यांसह स्थानिक प्रशासनानेही खासगी शिक्षण संस्थांनी पालकांना फीची सक्ती न करण्याचे आदेश दिले होते. असे असतानाही अनेक शाळांत फी न भरलेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात घेतलेच नाही. उलट शुल्क वसुलीसाठी खासगी शाळांनी सुरू केलेल्या या छुप्या अजेंड्यामुळे पालक मात्र, चांगलेच त्रस्त झाले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांची परीक्षा न घेताच मे महिन्यात सर्वांना उत्तीर्ण करून पुढच्या वर्गात ढकलण्यात आले. परिणामी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याचा आणि पालकांनी फी भरण्याचा काही प्रश्नच उद्भवला नाही. बहुतांश पालक वर्षाची फी दोन टप्प्यांमध्ये भरण्याला प्राधान्य देतात. शाळा सुरू झाल्यानंतर आणि दिवाळीच्या सुट्टीनंतर फी भरण्यात येते. मात्र, बेताची आर्थिक स्थिती असलेले पालक तीन महिन्यांची फी एकत्र भरण्याचा पर्याय निवडतात. सध्या नोकरीच्या ठिकाणी पगारांमध्ये झालेली कपात लक्षात घेता पालकांना ही फी भरणं शक्य नाही.
सध्या नववीच्या वर्गातून दहावीत गेलेल्या विद्यार्थ्यांचे आॅनलाईन वर्ग सुरू झाले आहेत. यासाठी अनेक शाळांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचा तुकडी निहाय व्हॉटसअॅप ग्रुप सुरू केला आहे. नियमितमपणे या ग्रुपवर अध्यापनाबरोबरच गृहपाठही दिला जातो. विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्याची पूर्ण फी भरली आहे, त्यांनाच या ग्रुपमध्ये घेण्यात आले आहे. फी पूर्ण न भरल्याने तुमच्या पाल्याचा प्रवेश निश्चित केला नाही, असं कारण सांगून खासगी शाळांनी वसुलीच्या नावाखाली विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान करण्याचेच धोरण अवलंबले आहे.
मुठभर शाळांनी राबविलेल्या या धोरणामुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात गढूळ वातावरण होऊ लागलं आहे. कोणत्याही पालकाला खिशात पैसे असताना आपल्या मुलांचं शैक्षणिक नुकसान करून काहीच मिळणार नाही, याची जाणीव शाळा प्रशासनाने ठेवण्याची गरज आहे, अशी अपेक्षा पालकांतून व्यक्त होऊ लागलीय. तर कोरोनाच्या संकटात आपल्या पाल्याला शिक्षण देणारी संस्थाही आर्थिक अडचणीत सापडू नये, यासाठी पालकांचाही पाठिंबा शाळेला आवश्यक आहे.
मुलं शाळेतच नाहीत तर फी कशाची भरायची ?
मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाच्या भितीने पालकांनी मुलांना शाळेतच पाठविले नाही. त्यानंतर २३ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे सर्व शाळा बंदच ठेवण्यात आल्या. लॉकडाऊन वाढला आणि विद्यार्थ्यांच्या शाळेत जाण्याच्या आशा संपूर्णपणे मावळल्या. परीक्षा रद्दच्या निर्णयानंतर विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्याचा प्रश्नच नाही. मुलं शाळेत गेलीच नाहीत तर फी कशाची भरायची असा सवाल पालक करतायत.
शाळा बंद तरीही शिक्षकांचे पगार सुरूच..!
मार्च महिन्यापासून विद्यार्थी शाळेत आले नाहीत, पण विद्यार्थ्यांसाठी आॅनलाईन आणि व्हॉटसअॅपवरून अभ्यास दिला जात होता. मुलं शाळेत नसलीतरीही शासन आदेशानुसार शिक्षक नियमितपणे आॅनलाईन अध्यापनाचे काम करत होते. ज्याप्रकारे फीची सक्ती नको, असे शासन सांगत होते. तसेच कोणाच्याही पगारात कपात नको, असंही शासनाने कळवलंय. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पगार नियमित सुरू असल्याचे शाळांचे म्हणणे आहे.
शासनाच्या आदेशानुसार कोरोनाच्या या काळात फीमध्ये वाढ तसेच सक्तीने वसुली करु नये अशी सूचना शाळांना यापूर्वी लेखी पत्राद्वारे केली आहे. मुख्याध्यापकांबरोबर झालेल्या आॅनलाईन बैठकीतही याविषयी सांगण्यात आले आहे. तरीही असा काही प्रकार घडत असेल तर गैर आहे. याबाबत संबंधित पालकांनी खासगीत लेखी तक्रार केली तर संबंधित शाळांवर कारवाई करण्यात येईल.
- राजेश क्षीरसागर
माध्यमिक शिक्षणाधिकारी