अतिदुर्गम भागातील विद्यार्थी थेट सफरचंदाच्या बागेत!, पाहणी करून घेतले लागवडीचे धडेही
By प्रगती पाटील | Published: April 18, 2023 03:38 PM2023-04-18T15:38:52+5:302023-04-18T15:40:04+5:30
चक्क दुष्काळी भागात फुलवली सफरचंदाची बाग
सातारा : आपला देश हा कृषिप्रधान आहे पण प्रांतिक अडथळ्यांमुळे अनेक फळांची झाडे विद्यार्थ्यांना पाहता येत नाहीत. हे लक्षात घेऊन अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी चक्क दुष्काळी भागात फुललेली सफरचंदाच्या बागेचा दौरा केला. शेती कशी असावी, बाग कशी ठेवावी, स्वच्छता सगळंच विद्यार्थ्यांना पाहण्यासारखं आणि शिकण्यासारखं होतं. परिस्थितीमुळे हिमालय अन् जम्मु-काश्मीरला जाणं शक्य नसणाऱ्या या विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटीच्या निमित्ताने शेतीतील नवीन प्रयोगही अनुभवता आले.
सातारा जिल्हा परिषदेची माण तालुक्यातील अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरावस्ती (टाकेवाडी) या शाळेतील विद्यार्थ्यांना क्षेत्र भेटीसाठी जम्मु-कश्मिर किंवा हिमालयात नव्हे तर चक्क अतिदुर्गम भागातील टाकेवाडी गावचे बागायतदार शेतकरी जालिंदर दडस यांनी लावलेल्या सफरचंदाच्या बागेस भेट दिली. दुष्काळी माळरानावर सफरचंदाची बाग बघून लेकरं हरकली. लागवडीच्या धड्यांसह सफरचंदाचाही आस्वादही मुलांनी घेतला.
सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माण तालुक्यातच सफरचंदाची बाग विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखवली. मुख्याध्यापक अशोक गोरे व उपक्रमशील शिक्षिका भारती ओंबासे यांनी या सहलीचे आयोजन केले होते. बाजारात विक्रीस येणारे सफरचंद झाडावर दिसते कसे? त्याचे झाड असे असते? या विद्यार्थ्यांच्या कुतूहलाचे शमन प्रत्यक्ष स्व-अनुभवातील शिक्षणाने विद्यार्थ्यांना मिळाले.