विद्यार्थ्यांना बनवलं मित्र अन् हॉकर्सना कान, नाक, डोळे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:02 AM2021-01-08T06:02:31+5:302021-01-08T06:02:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : गुन्हेगार अन् चोरट्यांना गर्दीचे ठिकाण असलेले कुठलेही बसस्थानक नेहमीच हवे-हवेसे वाटत असते. गुन्हा ...

Students made friends, ears, nose, eyes for hawkers! | विद्यार्थ्यांना बनवलं मित्र अन् हॉकर्सना कान, नाक, डोळे!

विद्यार्थ्यांना बनवलं मित्र अन् हॉकर्सना कान, नाक, डोळे!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : गुन्हेगार अन् चोरट्यांना गर्दीचे ठिकाण असलेले कुठलेही बसस्थानक नेहमीच हवे-हवेसे वाटत असते. गुन्हा करण्यासाठी ही जागा त्यांच्यासाठी अत्यंत सुरक्षित. मात्र, सातारा बसस्थानक याला अपवाद ठरलंय. पोलिसांच्या अथक्‌ प्रयत्नानंतर बसस्थानक गुन्हेगारी अन् पाकीटमारमुक्त झाले आहे. विशेष म्हणजे बसस्थानकातील गुन्हेगारी शून्यावर आलीय. विद्यार्थ्यांना मित्र अन् हॉकर्सना कान, नाक, डोळे बनवलं. प्रसंगी त्यांना पोलीसी प्रशिक्षणही दिलं. त्यामुळेच सातारा बसस्थानक गुन्हेगारीमुक्त होण्यास करणीभूत ठरलं.

महाराष्ट्रातील सर्वच बसस्थानकांमध्ये दररोज अनेक गुन्हे घडत असतात. चोरी, मारामारी, अपहरण, तस्करी अशाप्रकारच्या गुन्ह्यांचा त्यामध्ये समावेश असतो. बसस्थानक हे सर्वाधिक वर्दळीचे ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी गुन्हेगारांचा नेहमीच वावर असतो. त्यामुळे राज्यभरातील सर्वच बसस्थानके ही गुन्हेगारांचे मुख्य केंद्र बनत आहेत. पण साताऱ्यातील बसस्थानक याला अपवाद आहे. याला कारणही तसेच आहे. पाच वर्षांपूर्वी सातारा बसस्थानकातही रोज मारामारी, पाकीटमारी, सोनसाखळी चोरीचे गुन्हे घडत होते. परंतु गत तीन वर्षांपासून बसस्थानकातील पोलिसांनी अनोखी व्यूहरचना आखून बसस्थानक गुन्हेगारीमुक्त करण्याचा चंग बांधला. रोज एसटीने ये-जा करणाऱ्या महाविद्यालयीन युवकांना पोलिसांनी आपलंस करून पोलीसमित्र बनवलं. विद्यार्थ्यांचे वेगवेगळे ग्रुप तयार केले. कॉलेजपासून ते घरापर्यंत ज्या ज्या घटना घडतात, त्या त्या घटना बसस्थानकातील पोलीस चौकीत समजू लागल्या. त्यामुळे महाविद्यालयीन युवतींचे छेडछाडीचे आणि युवकांमधील मारामारीचे प्रकारही थांबले गेले. बसस्थानकात पाकीटमारी आणि वेगवेगळ्या वस्तूंची तस्करी होत होती. हे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी हॉकर्सना मित्र बनवलं. एवढेच नव्हे, तर त्यांना प्रशिक्षणही दिले. संशयास्पद वस्तू आणि व्यक्ती कशा ओळखायच्या, याची इत्यंभूत माहिती त्यांना देण्यात आली. बसस्थानकात थांबलेल्या एसटीमध्ये फिरून हॉकर्स पदार्थ विकत असतात. त्यामुळे प्रवाशांना ओळखण्याचं त्यांच्याकडं एक वेगळं कौशल्य आहे. एखादी व्यक्ती संशयास्पद दिसल्यास तत्काळ चौकीतील पोलिसांना हे हॉकर्स माहिती देऊ लागले. परिणामी पाकीटमार आणि सोनसाखळी चोरटे रंगेहात सापडले गेले. महाविद्यालयीन विद्यार्थी आणि हॉकर्सकडून अगदी छोट्‌यातली छोटी गोष्टही पोलिसांना समजू लागली. त्यामुळे बसस्थानकातील सर्व अवैध प्रकार पूर्णपणे आटोक्यात आले. एकेकाळी गुन्हेगारांसाठी सुरक्षित असलेले हे बसस्थानक आता गुन्हेगारांचे कर्दनकाळ ठरले आहे.

चौकट :

पाठीवर शाबासकीची थाप!

पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली बसस्थानकातील ही टीम काम करत आहे. या टीममध्ये हवालदार दत्ता पवार, प्रवीण पवार, अजयराज देशमुख, विलास गेडाम, महिला कर्मचारी अंजली बामणे यांचा समावेश आहे. सातारा बसस्थानक गुन्हेगारीमुक्त केल्यामुळे तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी या टीमचा गौरव केला होता. या टीमच्या पाठीवर नूतन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांचीही शाबासकीची थाप पडल्याने आणखीनच उत्कृष्टरित्या ही टीम काम करू लागलीय. बसस्थानकातील या पोलीस चौकीचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे , ही चौकी लोकसहभागातून उभारण्यात आलीय. त्यानंतर सीसीटीव्हीचे जाळेही निर्माण केले. अशा प्रकारची गुन्हेगारीमुक्त बसस्थानकातील महाराष्ट्रातील ही एकमेव पोलीस चौकी आहे.

फोटो : ०४ जावेद खान

Web Title: Students made friends, ears, nose, eyes for hawkers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.