शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी संपावर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 12:43 PM2024-08-03T12:43:22+5:302024-08-03T12:44:58+5:30
विद्यार्थ्यांची मागणी काय?
शिरवळ : राज्यभरातील सहा पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी बेमुदत संपावर गेलेले आहेत. महाविद्यालयीन शिक्षण, तसेच विद्यालयांना जोडलेल्या पशुचिकित्सालयांवरही बहिष्कार विद्यार्थ्यांद्वारे टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय एरवी गजबजलेले असलेल्या या महाविद्यालयासमोर शुकशुकाट पसरला आहे.
यासर्व महाविद्यालयातील चार हजार विद्यार्थ्यांनी १ ऑगस्टपासून संप पुकारला आहे. राज्य सरकार खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी देत असल्याने भविष्यात बेरोजगारांची नवी फौज सरकारला उभी करायची आहे का? असा प्रश्न विद्यार्थ्यांद्वारे विचारण्यात आला. या आंदोलनामुळे सर्व ठिकाणी पशुचिकित्सालयांची सेवा ठप्प झाली आहे. या संपामुळे उपचारासाठीचा फटका अनेक जणांना बसण्याची शक्यता आहे.
वास्तविक बिहार, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये एकही खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय नसताना महाराष्ट्रात खासगी महाविद्यालयाची खरेच गरज आहे का? हा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारण्यात येत आहे. पाच शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय व तीन नियोजित शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय असणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, असे असतानाही नियोजित पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू न करता खासगी महाविद्यालयांना परवानगी देण्याचा उद्देश काय, हा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला गेला आहे.
विद्यार्थ्यांची मागणी काय?
महाराष्ट्रात जवळपास साडेतीन कोटी पशुधन असताना, त्यासाठी शासनाच्या नियमाप्रमाणे ६ हजार पशुचिकित्सकांची आवश्यकता आहे, परंतु जवळपास साडेदहा हजारांपेक्षा जास्त पशुचिकित्सक हे परवानाधारक आहेत. असे असतानाही सरकार खासगी महाविद्यालयांना परवानगी देऊन पशुवैद्यकीय शिक्षणाचे खासगीकरण, तर करतच आहे. सोबत भविष्यात बेरोजगारांची नवीन फळी उभी करत आहे. या सर्व बाबींचा विचार करून यावर योग्य तो निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.