पास असूनही विद्यार्थ्यांची एसटीसाठी परवड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2016 10:04 PM2016-02-11T22:04:49+5:302016-02-11T23:57:27+5:30

कऱ्हाड, पाटणच्या वाहकांची मनमानी : विद्यार्थ्यांना एसटीतून भररस्त्यात उतरविण्याचे प्रकार; पालकांमध्ये संतापाचे वातावरण

Students pass ST | पास असूनही विद्यार्थ्यांची एसटीसाठी परवड!

पास असूनही विद्यार्थ्यांची एसटीसाठी परवड!

Next

कऱ्हाड, पाटणच्या वाहकांची मनमानी : विद्यार्थ्यांना एसटीतून भररस्त्यात उतरविण्याचे प्रकार; पालकांमध्ये संतापाचे वातावरण
कऱ्हाड : सवलत पास असूनही विद्यार्थिनींना एसटीमधून उतरविण्याचा प्रकार सध्या एसटीच्या वाहकांकडून होत आहे. त्यामुळे पास असूनही अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करून खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. वाहकांच्या या मनमानीविरोधात पालकांमध्ये संतापाचे वातावरण असून, पासधारक विद्यार्थ्यांना एसटीमधून बिनधोक प्रवास करता यावा, अशी मागणी होत आहे.
कऱ्हाडसह पाटण तालुक्यातील हजारो विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी कऱ्हाडला येतात. या विद्यार्थ्यांना दररोज सकाळी रस्त्यावर एसटीची वाट पाहत तासन्तास थांबावे लागते. काही गावांना एसटीच्या स्वतंत्र फेऱ्या आहेत. मात्र, अनेक गावांना स्वतंत्र एसटी नसल्याने इतर गावांहून येणाऱ्या गाडीची ग्रामस्थांना वाट पाहावी लागते. कऱ्हाड-पाटण मार्गासह कऱ्हाड-तासगाव, कऱ्हाड-विटा, कऱ्हाड-मसूर या मार्गांवर दररोज सकाळी शेकडो विद्यार्थी एसटीची वाट पाहत थांबलेले दिसतात. मात्र, मुक्कामी एसटी संबंधित गावामधून भरून येत असल्याने या विद्यार्थ्यांना वेळेत एसटी मिळत नाही. अशातच कऱ्हाड वगळता अन्य आगाराच्या एसटीचे वाहक पासधारक विद्यार्थ्यांना एसटीमध्ये प्रवेश देत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना कऱ्हाडला महाविद्यालयात पोहोचायला उशीर होतो. जी तऱ्हा येताना विद्यार्थ्यांना पाहावी लागते तीच परिस्थिती घरी जाताना निर्माण होते. महाविद्यालय संपल्यानंतर विद्यार्थी सिटी बसने कऱ्हाड बसस्थानकात येतात. तेथून ते आपल्या गावाकडून जाणाऱ्या मार्गावरील एसटीमध्ये जातात. मात्र, या विद्यार्थ्यांना वाहक एसटीमध्ये प्रवेश देत नाहीत.
एसटी संबंधित थांब्यावर थांबत नसल्याचे किंवा तिकीट काढणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्याचे कारण सांगून वाहक विद्यार्थ्यांना एसटीतून खाली उतरवितात. पुन्हा या विद्यार्थ्यांना दुसरी एसटी शोधावी लागते. खिशात पास असूनही या विद्यार्थ्यांची एसटीसाठी परवड होताना दिसते.
वाहकांच्या या मनमानीविरोधात अनेक गावांमध्ये यापूर्वी उठाव झाला आहे. सुपने येथे काही महिन्यांपूर्वी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी एसटी अडविल्या होत्या. सुमारे दोन तास त्यांनी पाटणहून येणाऱ्या एसटी बसथांब्यावरच थांबवून ठेवल्या. त्यावेळी अधिकाऱ्यांनी सुपने बसथांब्यावर एसटी थांबविण्याचे आश्वासन दिल्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित केले. त्यानंतर काही दिवसांतच वसंतगड येथेही एसटी अडविण्यात आल्या.
त्यापाठोपाठ म्होप्रे गावानजीकही एसटी रोखल्या गेल्या. म्होप्रे हे कऱ्हाड तालुक्यातील शेवटचे गाव आहे. त्यामुळे पाटणहून येणाऱ्या पाटण आगाराच्या एसटी या थांब्यावर थांबविल्या जात नाहीत, असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. तसेच एसटी थांबलीच तर पासधारक विद्यार्थ्यांना एसटीमध्ये घेतले जात नाही. पास कऱ्हाड आगाराचा असल्याने तुम्ही त्या आगाराच्या एसटीतूनच प्रवास करा, असा सल्ला संबंधित वाहकांकडून दिला जातो.
दोन दिवसांपूर्वी कऱ्हाड येथे एसटीमध्ये बसलेल्या म्होप्रेच्या काही विद्यार्थिनींना वाहकाने कोल्हापूर नाक्यावरच एसटीतून खाली उतरविले. सर्वांसमोर अपमानास्पद वागणूक मिळाल्याने त्यावेळी अनेक युवतींना रडू कोसळले. हा प्रकार धक्कादायक असल्यामुळे काही युवकांनी म्होपे्र येथे संबंधित एसटी अडवून वाहकावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यामुळे विद्यार्थ्यांनी एसटी सोडली.
वाहकांच्या या मनमानी कारभाराबाबत व विद्यार्थ्यांच्या गैरसोयीबाबत आगाराने योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे आहे. पासधारक विद्यार्थ्यांना एसटीमध्ये प्रवेश मिळावा, अशी पालकांसह विद्यार्थ्यांची मागणी आहे. हे प्रकार असेच सुरू राहिले तर येत्या काही दिवसांत विद्यार्थी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असल्याचेही काही विद्यार्थ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Students pass ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.