एसटीतून निघतो धुर; विद्यार्थ्यांनी सांगितलं अन् एसटी आगाराने बदललं!
By प्रगती पाटील | Published: January 20, 2024 07:05 PM2024-01-20T19:05:08+5:302024-01-20T19:05:20+5:30
सातारा : पर्यावरणीय संवेदनशीलता मुलांमध्ये शालेय वयात रूजली तर त्याचा फायदा भविष्यातील नागरिक घडविण्याबरोबरच पर्यावरण संतुलन राखायलाही मदत होते. ...
सातारा : पर्यावरणीय संवेदनशीलता मुलांमध्ये शालेय वयात रूजली तर त्याचा फायदा भविष्यातील नागरिक घडविण्याबरोबरच पर्यावरण संतुलन राखायलाही मदत होते. डिसेंबर महिन्यात येथील गुरूकुल शाळेल्या काही विद्यार्थ्यांनी एसटी काळा धुर सोडत असल्याची बाब आगार व्यवस्थापकांच्या लक्षात आणून दिली. मुलांनी वेधलेल्या गोष्टीकडे गांभीर्याने घेत आगाराच्यावतीने या गाड्यांची तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे याबाबत शाळेला पत्र पाठवून या विद्यार्थ्यांचे कौतुकही करण्यात आले.
गुरुकुलच्या विद्यार्थ्यांची कमाल
शालेय शिक्षणाबरोबरच सामाजिक भान देण्याचे काम गुरुकुल स्कूल मध्ये करण्यात येते. याची प्रचिती गत महिन्यात कोरेगाव आगार व्यवस्थापकांना आली. गुरुकुल स्कूलचे सातवीतील विद्यार्थी सिद्धी जगताप, विराज भोसले, सार्थक जाधव यांनी २० डिसेंबर रोजी कोरेगाव आगारातील बस मधून काळा धूर येत असल्याबद्दल कोरेगाव आगार व्यवस्थापकांना पत्राद्वारे कळवले. यात विद्यार्थ्यांनी बस क्रमांक ही नमूद केला होता.
असा झाला धुर गायब!
शाळेतील विद्यार्थ्यांनी राज्य परिवहनच्या कोरेगाव आगारातील बस क्रमांक एम एच १४ बी टी ११८० या बसमधून काळा धूर येत असून प्रदूषण होत असल्याबाबत कार्यालयास लेखी कळविले. त्यानंतर या बसचे वॉल सेटिंग, एअर फिल्टर बदली तसेच स्पीड कमी करण्यात आले. यामुळे बसचे धूर येण्याचे बंद झाले. आगारातील सर्व बसेसची तपासणी करून
शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणीय जागृती होण्याच्या निमित्ताने विविध उपक्रम राबविले जातात. यातून विद्यार्थ्यांच्या बालमनावर पोषक परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांनी केलेला पत्रव्यवहार गांभीर्यपूर्वक घेऊन आगार व्यवस्थापकांनी केलेले बदल अनुकरणीय आहेत. यामुळे विद्यार्थ्यांनाही सजग नागरिक बनण्याचे धडे मिळत आहेत. - राजेंद्र चोरगे, गुरुकुल संस्थाचालक
कोरेगाव आगारातील एसटींची नियमित तपासणी केलीच जात असते. त्यातूनही शाळेतून पत्र मिळाल्यानंतर आम्ही संबंधित कर्मचाऱ्यांना याची कल्पना देऊन गाड्यांनी पुन्हा तपासणी करुन बिघाड दुरुस्त केला आहे. आता गाड्या सुस्थितीत आहेत. - प्रदीप मलवाडकर, आगार व्यवस्थापक, कोरेगाव