विद्यार्थ्यांनी केली ऐतिहासिक तळ्यांची दुरुस्ती -‘एनएसएस’चा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 11:36 PM2019-03-16T23:36:12+5:302019-03-16T23:37:13+5:30
छत्रपती शिवाजी महराज यांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या रायरेश्वर गडावर किसनवीर महाविद्यालयासह शिवाजी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या
वाई : छत्रपती शिवाजी महराज यांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या रायरेश्वर गडावर किसनवीर महाविद्यालयासह शिवाजी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शेकडो विद्यार्थ्यांनी रायरेश्वर गडावरील दोन ऐतिहासिक तळ्यांची दुरुस्ती, गडावरील परिसर स्वच्छता तसेच गडावर जाण्यासाठी रस्ता तयार केला.
किसनवीर महाविद्यालय व शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसांच्या निवासी कॅम्पचे आयोजन केले होते. या कॅम्पचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या हस्ते करण्यात आले. तर समारोप हा तीनवेळा महाराष्ट्र केसरी विजेते पैलवान व उपविभागीय पोलीस अधिकारी विजय चौधरी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी जगपरिक्रमा करणाऱ्या सायकलपटू वेदांगी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनामुळे विविध महाविद्यालयांतून आलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. तसेच दररोज योग शिबिराचे आयोजन मुलांमध्ये व्यायामाचे महत्त्व पटवून दिले. शिवाजी विद्यापीठाच्या शिवपरिक्रमा गडकोट किल्ल्यांच्या उपक्रमांतर्गत दोन दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे संयोजन किसनवीर महाविद्यालयाने केले होते.
रायरेश्वर गडावर जाण्यासाठी असणाºया अरुंद रस्त्यावर श्रमदान करून दोन किलोमीटरचा रस्ता रुंदीकरण केले. तळ्यांच्या दुरुस्तीसाठी लागणारे एक डंपर ग्रीट गडाखालून गडावर नेऊन मजुरी वाचविली, असे विविध उपक्रम राबवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका गडाचे संवर्धन करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करून इतरांपुढे एक आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केला. या श्रमदानाच्या कार्यक्रमासाठी कॉलेजचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर येवले, कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. आनंद घोरपडे, लेप्टनंट प्रा. समीर पवार यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी शिबिराच्या आयोजनामध्ये विशेष परिश्रम घेतले.
एक पाऊल स्वच्छतेकडे अभियानांतर्गत किसनवीर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांसह विविध महाविद्यालयांतून आलेल्या दीडशे विद्यार्थ्यांनी रायरेश्वर गडावर शंभू महादेवच्या मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. तसेच गडावरील ऐतिहासिक असणाºया दोन तळ्यांची दुरुस्ती करून पाणीसाठ्यात वाढ होण्यासाठी मदत, गडावरील गरीब कुटुंबाच्या शेतात गहू काढण्याची कामे या मुलांनी करून ग्रामस्थांना आपलेसे केले.