सीईटी अर्ज करायला विद्यार्थ्यांची धांदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:40 AM2021-07-28T04:40:44+5:302021-07-28T04:40:44+5:30
सातारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षा अर्ज भरण्यासाठी मंडळाची ...
सातारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षा अर्ज भरण्यासाठी मंडळाची अधिकृत वेबसाईट सुरू झाल्यानंतर अर्ज करायला विद्यार्थ्यांची धांदल सुरू आहे. २ ऑगस्टपर्यंत संकेतस्थळावर सुरू राहणार असल्याची माहिती कोल्हापूर विभागीय सचिव देवीदास कुलाळ यांनी दिली.
अकरावी प्रवेशासाठी सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे पसंतीचे महाविद्यालय मिळण्यासाठी सीईटी देण्याकडे विद्यार्थ्यांनी प्राधान्य दिले आहे. मात्र, हे अर्ज भरण्यासाठी मंडळाची अधिकृत वेबसाईट काही तांत्रिक अडचणीमुळे मागील पाच दिवस बंद करण्यात आली होती. सोमवारी दुपारनंतर मंडळाच्या संकेतस्थळावर सीईटी पोर्टल अॅक्सेस करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
राज्य बोर्डाची परीक्षा २०२१ पूर्वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी तसेच सीबीएसई, आयसीएसई व अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा शुल्क भरावे लागणार असल्याने त्यांच्यासाठी पेमेंट गेटवेची सुविधा उपलब्ध आहे. या विद्यार्थ्यांना सीईटी अर्ज भरण्यासाठी २८ जुलैला दुपारी ३ वाजल्यापासून उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्याबाबतची माहिती स्वतंत्रपणे कळवण्यात येणार असल्याची माहिती देवीदास कुलाळ यांनी दिली आहे.
....................