विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षांसाठी सज्ज राहावे, मंत्री उदय सामंतांचे आवाहन; उद्यापासून महाविद्यालये सुरु होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 04:58 PM2022-01-31T16:58:39+5:302022-01-31T17:00:34+5:30
शैक्षणिक गुणवत्ता टिकवण्यासाठी ऑफलाईन शिक्षणाची गरज
कऱ्हाड : ‘कोरोनाच्या संकटामुळे ऑनलाईन शिक्षण व ऑनलाईन परीक्षेचा निर्णय घ्यावा लागला. आता १ फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालये आपण प्रत्यक्ष सुरू करीत आहोत. १५ फेब्रुवारीपर्यंतच्या परीक्षा ऑनलाईनच होणार आहेत; पण त्यानंतर विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षेसाठी सज्ज राहावे,’ असे आवाहन राज्याचे तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले.
कऱ्हाड येथील शासकीय अभियांत्रिकी, फार्मसी महाविद्यालयात सोमवारी मंत्री सामंत यांनी आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
मंत्री सामंत म्हणाले, ‘शैक्षणिक गुणवत्ता टिकवण्यासाठी ऑफलाईन शिक्षणाची गरज आहे. पण कोरोनाच्या संकटामुळे ऑनलाईनचा नाईलाजाने आधार घ्यावा लागला. आता १ फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालये पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तरीदेखील स्थानिक परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी काही निर्णय घेऊ शकतात.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. मात्र, त्यामुळे विद्यार्थी वर्गाबाहेर राहू नयेत म्हणून लसीकरणाचे शिबिर महाविद्यालयात राबवण्यात येणार आहेत, असेही मंत्री सामंत यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. त्याचबरोबर महाविद्यालयातील प्राचार्यांना खर्च करताना मर्यादा होत्या. त्या मर्यादाही वाढविण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. तो निर्णय राज्यभरासाठी असल्याचे त्यांनी सांगितले.
तक्रार आली, तर कारवाई करणार...
तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्येही बोगस पदव्या दिल्या जात असल्याचे मत काही शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. याकडे मंत्री सामंत यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, तशा प्रकारची पुराव्यासह लेखी तक्रार माझ्याकडे कोणी दिली तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.
कऱ्हाड महाविद्यालयासाठी अनेक निर्णय..
- मंत्री सामंत यांनी कऱ्हाड येथील शासकीय महाविद्यालयांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी जाहीर केले. ते पुढीलप्रमाणे पुढील शैक्षणिक वर्षापासून कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग हा अभ्यासक्रम सुरू करणार
- कऱ्हाड येथे इनोवेशन सेंटर उभारण्यासाठी मागणी होत आहे. त्याचा ३१ मार्चपर्यंत प्रस्ताव मागवण्यात आला आहे. त्याला तातडीने मंजुरी देऊन ५ कोटींचा निधी देणार
- शासकीय महाविद्यालयात काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचारी व शिपाई यांना किमान वेतन कायद्याप्रमाणे १ एप्रिलपासून पगार देण्यात येणार
- मागासवर्गीय समाजातील मुलींच्या वसतिगृहासाठी ९ कोटींचा निधी देणार