विद्यार्थी बोलू लागले ‘जय हिंद’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 11:30 PM2018-06-17T23:30:07+5:302018-06-17T23:30:07+5:30
सचिन काकडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : शिक्षकांनी हजेरी घेतली की विद्यार्थ्यांच्या तोंडून एस सर.. येस मॅडम अथवा हजर असे शब्द आजही वापरले जातात. मात्र, यापुढे हे शब्द न उच्चारण्याचा निर्णय जिल्ह्यातील दोन शाळांनी घेतला आहे. मध्यप्रदेश सरकारने घेतलेल्या निर्णयाचे अनुकरण करीत या शाळेतील विद्यार्थी आता हजेरी घेतल्यानंतर एस सर.. एस मॅडम ऐवजी ‘जयहिंद’ बोलू लागले आहेत. विशेष म्हणजे या उपक्रमाची शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच अंमलबजावणी करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांमध्ये देशभावना वाढीस लागावी, यासाठी मध्यप्रदेश सरकारने नुकताच अनोखा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत सकाळी शिक्षकांनी हजेरी घेतली की एस सर.. एस मॅडम ऐवजी विद्यार्थी जयहिंद बोलू लागले आहेत. या निर्णयाचे विद्यार्थ्यांमधूनही स्वागत करण्यात आले. त्याच धरतीवर आता वाई तालुक्यातील अनपटवाडी व जावळी तालुक्यातील दुदुस्करवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांनीही विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि देशाभिमान वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
सैनिक आणि सैनिकांच्या कुटुंबासाठी काम करणाऱ्या ‘जयहिंद फाउंडेशन’कडून प्रेरणा घेऊन अनपटवाडी शाळेने या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. तसेच या देशभक्तीपर उपक्रमाची माहिती देण्यात आली. यानंतर शिक्षकांनी घेतलेल्या हजेरीनंतर विद्यार्थी ‘जय हिंद’ बोलू लागले. अनपटवाडीबरोबरच जावळी तालुक्यातील दुदुस्करवाडी प्राथमिक शाळेतही हा उपक्रम राबविण्यात आला आहे. शाळांनी राबविलेल्या या उपक्रमाचे पालकांमधूनही कौतुक होत आहे. या उपक्रमासाठी मुख्याध्यापक अनिल पिसाळ, रेणुका काळे, उमेश मोरे तसेच इतर शिक्षक वृंद यांनी पुढाकार घेतला आहे.