विद्यार्थी, शिक्षक अन् पालकांना प्रतीक्षा शाळेची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:26 AM2021-06-11T04:26:21+5:302021-06-11T04:26:21+5:30
वरकुटे-मलवडी : दरवर्षी १५ ते २० जून या कालावधीत सुरू होणाऱ्या शाळा यंदा ...
वरकुटे-मलवडी : दरवर्षी १५ ते २० जून या कालावधीत सुरू होणाऱ्या शाळा यंदा मात्र कोरोनाच्या प्रकोपामुळे सुरू होण्याबाबत अद्याप कोणताही शासन निर्णय झालेला नाही. त्यामुळे वर्षभर घरात राहून ऑनलाईन शिक्षण घेत असलेली मुले कंटाळली आहेत. मुलांना रंगीबेरंगी रंगांनी नटलेल्या वर्गखोल्या, शाळकरी मित्र-मैत्रिणी, मधूर वाणीने विश्वासात घेऊन शिक्षण देणाऱ्या शिक्षकांंसोबत हसत-खेळत वर्गात बसून शिक्षण घेण्याची ओढ आता निर्माण झाली आहे.
कोरोना महामारीमुळे माण तालुक्यासह राज्यातील माध्यमिक आणि प्राथमिक शाळा गेल्या वर्षभरात ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात येत आहेत. पहिली ते सातवी, आठवी ते दहावी व ११ वी, १२ वीनंतरच्या सर्व वर्गांचासुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच अभ्यासक्रम घेण्यात येत आहे. त्यावर सराव परीक्षासुद्धा घेण्यात आल्या. अनेकवेळा नेटवर्कच्या अडसरामुळे मुलांचा शाळेमध्ये होणारा अभ्यासक्रम आणि प्रत्यक्ष नेट कनेक्टिव्हिटीमधील अभ्यासक्रम यामध्ये बरीच तफावत आढळून आली आहे. त्याचे आता मूल्यमापनही होत आहे.
पहिली ते आठवीपर्यंत गेल्या वर्षभरात झालेल्या शैक्षणिक वर्षात सर्वांनाच उत्तीर्ण करावे, असे शासनाने आदेश काढले आहेत. कोरोनाच्या साथीमुळे धास्तावलेल्या शिक्षण विभागाने दहावी बोर्डाच्या परीक्षाही रद्द केल्या आहेत. तर मागील वर्षाच्या नववी आणि दहावीच्या गुणांकानुसार मुलांना उत्तीर्ण करावे, असे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानंतर शासनाने गेल्या आठवड्यात बारावी बोर्डाच्याही परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे राज्य सरकार काय निर्णय घेतेय आणि शाळेची घंटा कधी वाजते? याकडे शाळकरी मुलांसह पालकांचे आणि शिक्षकांचेही लक्ष लागून राहिले आहे.
(कोट)
यंदाच्या शैक्षणिक वर्षात जून महिना सुरू झाला असला तरी शाळा कधी सुरू होणार? याबाबत कोणताही धोरणात्मक निर्णय शिक्षण विभागाकडून आलेला नाही. काही दिवसांपूर्वी १४ जूनपासून ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरू होणार? अशाप्रकारची चर्चा सुरू होती. मात्र, यापुढे शाळा ऑनलाईन की ऑफलाईन पद्धतीने सुरू होईल, हे अजूनही प्रश्नांकित आहे.
- विनोद आटपाडकर,
प्राथमिक शिक्षक, वरकुटे
*शाळेचा फोटो घेणे