विद्यार्थी मानसिक तणावाखाली, तर पालक चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:58 AM2021-02-23T04:58:06+5:302021-02-23T04:58:06+5:30
पुसेगाव : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढीचा दर वाढत असल्याने दहावी, बारावीचे विद्यार्थी मानसिक तणावाखाली असून, पालकांनाही चिंता सतावत आहे. ...
पुसेगाव : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढीचा दर वाढत असल्याने दहावी, बारावीचे विद्यार्थी मानसिक तणावाखाली असून, पालकांनाही चिंता सतावत आहे. रुग्ण वाढतच राहिले तर अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या शिक्षण क्षेत्रासमोर पुन्हा संकट येऊ शकते. दोन दिवसांपूर्वी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांच्या संभाव्य वेळापत्रकवर परिणाम होऊ शकतो.
राज्यातील कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या शैक्षणिक वर्षातील मार्च, एप्रिल आणि चालू शैक्षणिक वर्षातील जूनपासून नोव्हेंबरपर्यंत राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांबरोबरच पदवी व पदवीव्युत्तर विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यानंतर नोव्हेंबरमध्ये दिवाळीपूर्वी आणि दिवाळीच्या सुटीनंतर नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास राज्य शासनाने नियम व अटी घालून परवानगी दिली. सध्या पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग आणि पदवी अभ्यासक्रमाचे सुरू झालेले आहेत; परंतु आठ-दहा दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढीचा दर असाच कायम राहिल्यास इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांच्या संभाव्य वेळापत्रकवर संकट उद्भवण्याची भीती राज्य शिक्षण मंडळाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.
यंदा बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे २०२१ या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत होणार आहे. मात्र, मागील ८ ते १० दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत रोज वाढ होत आहे. त्यामुळे विदर्भातील अमरावती, अकोला आणि यवतमाळमध्ये बाधित क्षेत्र जाहीर केले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सुरू झालेल्या पाचवी ते आठवीपर्यंत शाळा पुन्हा बंद करून ऑनलाईन वर्ग सुरू केले आहेत.
शिक्षण मंडळाच्या परीक्षांना अजूनही दोन महिन्यांचा कालावधी असला तरी कोरोना रुग्णांच्या संख्येत अशी वाढ होत राहिल्यास लेखी परीक्षा घेणे कठीण होणार आहे. मागील वर्षी लॉकडाऊनमुळे बारावी, दहावीच्या परीक्षांच्या निकालास विलंब झाला होता. आतातर दहा महिन्यांपासून शाळा-महाविद्यालये बंद होती. परिणामी २०२१ मधील परीक्षा एप्रिल-मे या कालावधीत घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, पुन्हा कोरोनाबाधित रुग्णसंख्येच्या वाढीमुळे चिंतेचे ढग गडद होत आहेत.
चौकट :
अभ्यासाचे नियोजन बिघडणार
दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची पुढील दिशा ठरविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची वर्षे आहेत. मात्र, कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने वेळापत्रकात बदल झाल्यास विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नियोजन बिघडणार आहे. शिवाय लेखी परीक्षा तीन तासांची असल्याने संक्रमणाच्या भीतीने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील वातावरणावर याचा विपरीत परिणाम होत असून, १६ ते १८ वर्षे वयोगटातील दहावी, बारावीचे विद्यार्थी मानसिक ताणतणावात असल्याच्या भावना अनेक पालकांनी व्यक्त केल्या.