अंगणवाडीतील चिमुकल्यांना ‘स्टडी टेबल’
By admin | Published: October 21, 2016 11:34 PM2016-10-21T23:34:09+5:302016-10-21T23:34:09+5:30
‘रोजगार फाउंडेशन’चा पुढाकार : येणके-पोतलेच्या अंगणवाड्यांचे रूप पालटतंय; ‘आयएसओ’ मानांकनाच्या दिशेने पाऊल
कऱ्हाड : इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे अन् ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाड्या ओस पडताहेत की काय? असा प्रश्न पडलाय. ग्रामीण भागातील पालकांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या इमारती, स्कूलबस सारं खुणवातंय; पण गावातील शाळांचा दर्जा सुधारण्याबाबत विचार कोण करणार? ‘रोजगार फाउंडेशन’चे प्रमुख हेमंत पाटील यांनी मात्र हा विचार कृतीतून दाखवून दिलाय. म्हणून तर येणके-पोतलेच्या पाच अंगणवाड्यांचे रूप पालटताना दिसत आहे. अंगणवाडीतील चिमुकल्यांसाठी अभ्यासपूर्ण ‘स्टडी टेबल’ देण्यात आले असून या माध्यमातून चिमुकले अध्यापणाचे धडे गिरवत आहेत.
कऱ्हाड तालुक्याच्या राजकारण, समाजकारणाच्या पटलावर
नेहमीच येणके अन् पोतले ही गावे चर्चेत असतात. येथे प्राथमिक अन् माध्यमिक शिक्षणाची सोय
उपलब्ध आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारती तर जुन्या आठवणींना उजाळा देतात. प्राथमिक शिक्षणाचे धडे देणारी जीवन शिक्षण विद्यामंदिरे आता इंग्रजी माध्यमांच्या शिक्षणाचे आकर्षण वाढल्याने ओस पडण्याची भीती निर्माण झाली
आहे. यांच्या कारणांचा शोध घेतला तर इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मुलांना मिळणाऱ्या सुख सुविधा जास्त आहेत. मुलांच्या भवितव्याचा विचार करीत पालक त्यासाठी पैसे मोजायला तयार आहेत. परिणामी गावच्या अंगणवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे पाहायला मिळते. हे चित्र बदलायचे असेल तर अंगणवाड्या, शाळांच्या इमारती चांगल्या व सोयींनियुक्त हव्यात हे ओळखून हेमंत पाटील यांनी येणके व पोतले या दोन गावांतील अंगणवाड्या अद्ययावत करण्याचा संकल्प केला.
पंतोजीमळा, पाटीलमळा, जुने गावठाण या पोतलेतील तीन अंगणवाड्या व येणके येथील दोन अंगणवाड्या त्यांनी डोळ्यासमोर ठेवल्या. चुलते ज्येष्ठ नेते बाबासाहेब पाटील व भाऊ उदय पाटील
यांच्या मदतीने त्यांनी सुमारे शंभर स्टडी टेबल या अंगणवाड्यांना दिले आहेत.
मुलांना खेळण्यासाठी लागणारे साहित्य पुरविले आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात पालकांचा ओढा या गावातील अंगणवाड्यांकडे वाढायला हरकत नाही. (प्रतिनिधी)
‘स्टडी टेबल’वरच आता एबीसीडीग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पाटी आणि पेन्सील घेऊन अंगणवाडीतील वर्गातील फरशीवरच बसविले जाते. त्यांनाही बसण्यासाठी अंगणवाडीमध्ये स्टडी टेबल असणे गरजेचे आहे. हे ओळखून पोतले येथील अंगणवाडी क्रमांक २०१ मध्ये आकर्षक पद्धतीची छान-छान स्टडी टेबल देण्यात आले आहेत. त्यावरती एबीसीडीसह आवश्यक माहितीही आहे.