शेनवडीच्या उपसरपंचांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:26 AM2021-06-29T04:26:06+5:302021-06-29T04:26:06+5:30
वरकुटे-मलवडी : शेनवडी ता. माण येथील उपसरपंच सचिन वाघमारे (वय ४०) यांना राहत्या घरी विजेचा धक्का बसला. त्यानंतर त्यांचा ...
वरकुटे-मलवडी : शेनवडी ता. माण येथील उपसरपंच सचिन वाघमारे (वय ४०) यांना राहत्या घरी विजेचा धक्का बसला. त्यानंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई आणि एक बहीण आहे.
याबाबत माहिती अशी की, मागील दोन दिवसांपासून शेनवडी, वरकुटे-मलवडी परिसरात अधूनमधून रिमझिम पाऊस पडत होता. वातावरण ओलसर व दमट झाल्याने सचिन वाघमारे घरातच इलेक्ट्रॉनिक शेगडी जोडत बसले होते. मात्र अनवधानाने हाताला विजेचा झटका लागून अचानक बाजूला फेकले गेले. त्यानंतर ग्रामस्थांनी धावाधाव करून, उपचारासाठी ताबडतोब म्हसवड येथील दवाखान्यात घेऊन गेले. मात्र पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेतून अकलूज येथे घेऊन जात असतानाच वाटेतच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलीस पाटील संतोष खिलारी यांनी दिली.
सचिन वाघमारे हे ग्रामपंचायत निवडणुकीत कोणतेही आरक्षण नसताना स्वबळावर अपक्ष उभे राहून विजयी झाले. तसेच उपसरपंच झाले होते. या घटनेची नोंद म्हसवड पोलीस ठाण्यात झाली आहे. म्हसवड पोलीस तपास करीत आहेत.