दीड हजाराची लाच स्वीकारताना साताऱ्यात सह दुय्यम निबंधक लाचलुचतपच्या जाळ्यात
By दत्ता यादव | Published: May 10, 2023 02:14 PM2023-05-10T14:14:30+5:302023-05-10T14:34:32+5:30
नोटीस ऑफ इंटिमेशनची पाच प्रकरणे मंजूर करण्यासाठी मागितली होती लाच
सातारा : नोटीस ऑफ इंटिमेशनची पाच प्रकरणे मंजूर करण्यासाठी दीड हजाराची लाच घेताना सह दुय्यम निबंधक उदय धनाजी सूर्यवंशी (वय ४२, रा. पुणे) याला लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज, बुधवारी सकाळी दहा वाजता करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, साताऱ्यातील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये तक्रारदाराला नोटीस ऑफ इंटिमेशनची पाच प्रकरणे मंजूर करायची होती. त्यासाठी संबंधित तक्रारदार दुय्यम निंबधक कार्यालयात गेले होते. त्यावेळी सह दुय्यम निंबधक उदय सूर्यवंशी याने तक्रारदाराकडे पाच प्रकरणे मंजूर करण्यासाठी प्रत्येकी तीनशे रुपये प्रमाणे १५०० रुपये लाचेची मागणी केली. या प्रकारानंतर संबंधित तक्रारदाराने साताऱ्यातील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात जाऊन रीतसर लेखी तक्रार दिली.
त्यानंतर बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास लाचलुचपतच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निबंधक कार्यालयातच सापळा लावला. यावेळी तक्रारदाराकडून १५०० हजारांची लाच घेताना सह दुय्यम निबंधक उदय सूर्यवंशी याला रंगेहाथ पकडण्यात आले.
पोलिस उपअधीक्षक उज्ज्वल वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक प्रशांत नलावडे, तुषार भोसले यांनी ही कारवाई केली.