तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीचा प्रस्ताव सादर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:40 AM2021-05-19T04:40:28+5:302021-05-19T04:40:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोकण किनारपट्टीवर आलेल्या तौक्ते चक्रीवादळाचा फटका पाटण तालुक्यालाही बसला आहे. त्या वादळासह मुसळधार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोकण किनारपट्टीवर आलेल्या तौक्ते चक्रीवादळाचा फटका पाटण तालुक्यालाही बसला आहे. त्या वादळासह मुसळधार पावसामुळे ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे, त्यांना तातडीची मदत मिळण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनामार्फत पाठवून शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
चक्रीवादळामुळे व पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत मंगळवारी गृह राज्यमंत्री यांनी पाटण तालुक्यातील शिरेवाडी, मंद्रुळकोळे, चिबेवाडी, केरळ, आदी नुकसानग्रस्त गावांना भेट देऊन पाहणी केली व त्यानंतर झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार योगेश टोमपे, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे, सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माझी, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अजित पाटील, विद्याधर शिंदे उपस्थित होते.
या पावसामुळे पिण्याच्या पाण्याच्या योजनांचे पाईप वाहून गेले आहेत. जवळजवळ ३०० पेक्षा जास्त विजेचे खांब वाकून पडले, काही पूर्ण निखळून पडले. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. वाकलेले विजेचे खांब तातडीने सरळ करून विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. उद्या दुपारपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहेत, त्यांना तातडीची मदत देण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाकडे करावा व त्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याबाबत आपण शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
फोटो ओळ : पाटण तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली.