ढेबेवाडी पोलिसांच्या वसाहतीचा प्रस्ताव सादर करा : शंभूराज देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:39 AM2021-02-10T04:39:33+5:302021-02-10T04:39:33+5:30
सातारा : ‘ढेबेवाडी येथील पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या वसाहतीचा प्रस्ताव सादर करावा’, अशी सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली. त्याचबरोबर ...
सातारा : ‘ढेबेवाडी येथील पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या वसाहतीचा प्रस्ताव सादर करावा’, अशी सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली. त्याचबरोबर सात पोलीस ठाण्यांच्या वसाहत दुरुस्तीसाठी नियोजन समितीमधून निधी दिला असून, तातडीने काम सुरू करावे, असेही त्यांनी बांधकाम विभागाला सांगितले.
जिल्ह्यातील पोलीस, अधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांच्या समस्यांसंदर्भात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलीस अधीक्षक व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी माहिती घेत काही सूचनाही केल्या. पोलीस अधीक्षक कार्यालय, सातारा शहर पोलीस ठाणे व शहर वाहतूक शाखेच्या नवीन इमारतींचा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्य पोलीस दलात १२ हजार पदे भरण्यात येणार आहेत. त्यामधील ५ हजार ४०० पदे भरायला प्राधान्यक्रमाने सुरुवात करणार आहे. पहिल्या टप्प्यात ही पदे भरली जातील, असेही गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.
.................................................