अजिंक्यतारा किल्ल्याच्या दरीत अडकलेल्या दोन पोलिसांसह तिघांना बाहेर काढण्यात अखेर यश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 09:54 AM2018-02-19T09:54:38+5:302018-02-19T09:55:00+5:30
अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या दरीत अडकलेल्या दोन पोलिसांसह तिघांना बाहेर काढण्यात अखेर यश आलं आहे.
सातारा : अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या दरीत अडकलेल्या दोन पोलिसांसह तिघांना बाहेर काढण्यात अखेर यश आलं आहे. अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या दरीत पडून एक इसम तब्बल दोन रात्र असहायपणे तळमळत राहिला. त्याला वाचवण्यासाठी खाली गेलेले दोन पोलीस कर्मचारीही एक रात्र खाली अडकून पडले. अखेर या तिघांनाही दरीतून बाहेर काढण्यात महाबळेश्वर ट्रेकर्सच्या कार्यकर्त्यांना यश आलं आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, शनिवारी सायंकाळी कोडोली येथील संभाजी जाधव हा इसम अजिंक्यताऱ्यावर फिरण्यासाठी गेला होता. मात्र, अजिंक्यताऱ्याच्या पाठीमागील दरीत पाय घसरून तो खाली गडगडत गेला. शुध्दीवर आल्यानंतर त्याने ओरडायला सुरूवात केली, मात्र त्या भागात कोणीही आले नाही. शनिवारची रात्र आणि रविवारचा दिवस तसाच गेला. रविवारी सायंकाळी काही युवक गडावर फिरायला आले असताना खाली दरीत एका इसमाचा आवाज आवाज ऐकून त्यांनी मोबाइलवरून पोलिसांना माहिती दिली.
त्यानंतर दोन पोलीस कर्मचारी शोध घेत जखमीपर्यंत पोहचले, परंतु त्या व्यक्तीला घेऊन पुन्हा वर येणे या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना शक्य झाले नाही. पोलिसही रविवारी रात्रभर खाली दरीतच अडकले. अखेर कोडोली पोलीस चौकीचे फौजदार कदम यांनी महाबळेश्वर ट्रेकर्सच्या कार्यकर्त्यांना बोलावून घेतले. कार्यकर्ते सोमवारी पहाटे अजिंक्यता-यावर पोहचले. त्यांनी जखमी संभाजीसह दोन पोलिस कर्मचाऱ्यांनाही दरीतून बाहेर काढले.
या मोहिमेत महाबळेश्वर ट्रेकर्सचे कार्यकर्ते अनिल केळगणे, संजय पार्टे, सुनिलबाबा भाटिया, सनी बावळेकर, निलेश बावळेकर, प्रवीण जाधव, दृवास पाटसुते यांनी परिश्रम घेतले.