‘जलयुक्त शिवार’ अभियान यशस्वी करुया
By admin | Published: December 17, 2014 09:28 PM2014-12-17T21:28:10+5:302014-12-17T23:03:28+5:30
जिल्हाधिकारी : दुष्काळावर मात करण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन
सातारा : ‘राज्यातील दुष्काळ कायमस्वरूपी मिटविण्यासाठी राज्य शासनाने ‘जलयुक्त शिवार’ अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे, जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी समन्वयाने हे अभियान यशस्वी करावे,’ असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी मंगळवारी येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ‘जलयुक्त शिवार’ अभियान राबविण्यात जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व वनविभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, उपजिल्हाधिकारी पराग सोमण, अधीक्षक कृषी अधिकारी प्रतापसिंह कदम आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, ‘राज्यातील दुष्काळ कायमस्वरूपी घालविण्यासाठी राज्य शासनाने ‘जलयुक्त शिवार’ अभियान हाती घेतले आहे. या अंतर्गत तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष हे प्रातांधिकारी असणार आहेत. सिंचन क्षेत्रात वाढ करणे, पाण्याच्या क्षमतेत वाढ करणे, त्याचप्रमाणे पीकपद्धतीत बदल करावे लागतील. यासाठी तुषार तसेच ठिबक सिंचनपद्धती राबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी लागेल. तर काही ठिकाणी पाण्याच्या नियंत्रणासाठी कठोर पावले उचलावी लागतील.’
‘प्रांताधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर समिती गठित करून त्यामध्ये साखर कारखाने, सूतगिरणी, बाजार समिती, स्वयंसेवी संस्था, उद्योजक, सामाजिक संघटना, सेवाभावी मंडळे आदींचा समावेश करावा,’ असेही मुदगल म्हणाले. (प्रतिनिधी)
ही कामे लागतील मार्गी...
बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजना पुनर्जीवित करणे, विकेंद्रित पाणीसाठे निर्माण करणे, गाळ काढण्यासाठी मोठी मोहीम, हातपंपाच्या दुरुस्ती, पाण्याचा ताळेबंद राखणे, आपल्या प्रियजनांच्या नावाने स्मृतिवन निर्माण करण्यासाठी प्रवृत्त करावे. हिरवी टेकडी, वृक्षारोपण, नाला खोलीकरण, सरळीकरण, माथा ते पायथा सीसीटी आदी पाणलोट विकासाचे कामे करावयाची आहेत. ठिकठिकाणी जुन्या बंधाऱ्याची दुरुस्ती, शेततळ्याची दुरुस्ती, नाले, ओढे जोडणे आदी कामे करावयाची आहेत.