कोळेवाडी शाळेचे निबंध स्पर्धेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:39 AM2021-04-24T04:39:10+5:302021-04-24T04:39:10+5:30
कुसूर : राज्य शासन आणि जिल्हा परिषद सातारा यांच्यावतीने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या उपक्रमाअंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन ...
कुसूर : राज्य शासन आणि जिल्हा परिषद सातारा यांच्यावतीने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या उपक्रमाअंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत कऱ्हाड तालुक्यातील कोळेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची सातवीची विद्यार्थिनी वैभवी विजयसिंह देसाई हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला.
कोरोनाने सर्वत्र शिरकाव केल्यानंतर शासन स्तरावर, आरोग्य विभागाकडून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. यावेळी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती. या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये विविध शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व स्पर्धा कोविड कालावधी असल्याने ऑनलाईन पद्धतीने घेतल्या होत्या. यापैकी निबंध स्पर्धेत संपूर्ण सातारा जिल्ह्यातून वैभवी विजयसिंह देसाई ही प्रथम आली आहे. तिला जिल्हा परिषदेच्यावतीने नुकतेच प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. या यशाबद्दल तिचे गटशिक्षणाधिकारी मुजावर, शिक्षण विस्तार अधिकारी मुलाणी, केंद्र प्रमुख सुवर्णा मुसळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास पाटील, सरपंच रत्नमाला पाटील व मुख्याध्यापक मोहन शिनगारे यांनी कौतुक केले. या स्पर्धेसाठी तिला वर्गशिक्षक संदीप कोरडे, शोभा चव्हाण, रुक्साना मुल्ला, विद्याराणी पाटील, प्रमोद गायकवाड, शुभांगी गुजर व राजलक्ष्मी देशमुख यांनी मार्गदर्शन केले.