दोन बालविवाह रोखण्यात लेक लाडकी अभियानाला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:40 AM2021-05-09T04:40:47+5:302021-05-09T04:40:47+5:30

सातारा : कोरोनाच्या काळात प्रशासन व्यस्त व इतर यंत्रणा गाफील असल्याचा लाभ उठवत बीड जिल्ह्यात अल्पवयीन मुलींचे विवाह उरकण्याचा ...

Success of Lake Ladki campaign in preventing two child marriages | दोन बालविवाह रोखण्यात लेक लाडकी अभियानाला यश

दोन बालविवाह रोखण्यात लेक लाडकी अभियानाला यश

Next

सातारा : कोरोनाच्या काळात प्रशासन व्यस्त व इतर यंत्रणा गाफील असल्याचा लाभ उठवत बीड जिल्ह्यात अल्पवयीन मुलींचे विवाह उरकण्याचा डाव साताऱ्याच्या लेक लाडकी अभियानाने उधळवून लावला. मोबाइलमध्ये आलेल्या एका मेसेज, अभियानाच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे चार दिवसात दोन बालविवाह रोखण्यात यश आले.

बीड जिल्ह्यातील शिरुर कासार तालुक्यात बालविवाहांची समस्या आहे. काही वर्षे साताऱ्यातील लेक लाडकी अभियानाच्या संचालिका ॲड. वर्षा देशपांडे त्यावर शिरुरकासार तालुक्यात काम करतात. अकरावीत शिकत असलेली १७ वर्षांची कविता (नाव बदलले आहे) शाळेच्या दिवसांत लेक लाडकी अभियान आणि यूएनएफपीएच्या बालविवाह रोखून मुलींना स्वयंपूर्ण करण्याच्या एका प्रकल्पामध्ये कविता सक्रिय होती. वडील नसल्याने आईसह मामाच्या आधाराने ती एका दुर्गम वाडीत राहते. विधी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊन वकील व्हायचे तिचे स्वप्न आहे.

लॉकडाऊनमुळे वीस लोकांच्या उपस्थितीची अट असल्याने लग्न स्वस्तात होते. कविताच्या मामांनीही तिच्यासाठी पैठणहून स्थळ आणले आणि लग्नाची तयारी सुरू केली. कविता आणि आईने त्याला विरोध केला; पण त्यांना गप्प बसवले गेले. बहिणीचा बालविवाह झाल्याने आयुष्याची झालेली फरफट ती बघत होती. हट्ट करून, रडूनही मामाला पाझर फुटत नाही म्हटल्यावर तिने ॲड. वर्षा देशपांडे यांना मेसेज पाठवला. त्यानंतर चक्रे हलली.

अभियानाकडून तातडीने जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा बाल संरक्षण समिती, जिल्हाधिकारी, शिरुरकासार पोलीस स्टेशनशी संपर्क साधला. पोलीस अधीक्षकांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. १०९८ या चाइल्ड हेल्प लाइनवरही तक्रार नोंदवली. ४ एप्रिलला चाइल्डलाइनकडून वाडीच्या ग्रामसेवकांना तातडीने पत्र गेले. बुधवारी, ५ एप्रिल रोजी महिला पोलिसासह सरिता आणि तिच्या पालकांना बीडला बालकल्याण समितीसमोर उपस्थित राहण्यास सांगून हा विवाह रोखला गेला. लॉकडाऊन संपताच तिच्या पुढील शिक्षण आणि पुनर्वसनाची जबाबदारी लेक लाडकी अभियान उचलणार आहे.

याच तालुक्यातील एका गावात दुसरा बालविवाह रोखला गेला. विमल (नाव बदलले आहे) ही मुलगी सोळा वर्षांची असून, इयत्ता ७ वीत शिकते. तिच्या वडिलांनी स्थळ पाहिले होते. आजच तिचा विवाह होणार होता; मात्र एवढ्यात लग्न न करता विमलला शिक्षण पूर्ण करायचे आहे. दारात मांडवही पडला होता. विमलच्या मैत्रिणीने विमलच्या इच्छेविरोधात लग्न होत असल्याची माहिती देशपांडे यांना कळवली. हायस्कूल शिक्षकांकडून मिळालेली माहिती तपासण्यात आली. ग्रामसेवक व अंगणवाडीताई यांची मदत घेण्यात आली. यंत्रणेला याबाबत अभियानाकडून सजग करण्यात आल्यानंतर हा विवाहही पालकांचे हमीपत्र घेऊन रोखण्यात आला आहे.

कोट

पंचवीस लोकांमध्ये लग्न करायला परवानगी असल्याने बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात बालविवाहांना सुरुवात झाली आहे. शिरूर कासारमध्ये यापूर्वी आम्ही काम केलं असल्यामुळे संबंधित मुलीने व्हॉट्सअपच्या माध्यमातून एक मेसेज करून आमच्याशी संपर्क साधला. त्यामुळे हा बालविवाह रोखता आला. दुसऱ्या घटनेत मुलीच्या मैत्रिणीमुळे संपर्क होऊ शकला.

- ॲड. वर्षा देशपांडे

संचालिका, लेक लाडकी अभियान

Web Title: Success of Lake Ladki campaign in preventing two child marriages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.