‘दुधेभावी-घोरपडी’ तलाव प्रकल्प यशस्वी
By Admin | Published: November 14, 2016 09:34 PM2016-11-14T21:34:59+5:302016-11-15T00:57:44+5:30
राज्यातील पहिला प्रकल्प : ढालगाव परिसराला वरदान; ढोलेवाडी, बेवनूर गावातील लाभक्षेत्र पाण्याखाली
ढालगाव : कवठेमहांकाळ तालुक्यातील दुधेभावी तलावातून सायफन पध्दतीने घोरपडी तलावात पाणी सोडण्यात आले. राज्यातील हा पहिला तलाव जोड प्रकल्प यशस्वी करण्यात आला आहे.
ढालगाव भागातील २ गावे दुष्काळी परिस्थितीशी सामना देत आहेत. सहा महिन्यांपूर्वी खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रयत्नामुळे टेंभूचे पाणी कवठेमहांकाळ तालुक्यात आले. नागजच्या ओढ्यात हे पाणी सोडून ते दुधेभावी तलावात सोडण्यात आले. त्यामुळे या तलावातून ढालगाव, चोरोची, कदमवाडी, दुधेभावी, ढोलेवाडी या गावांना पाणी मिळणार असल्याने, या गावांना हा तलाव आता वरदान ठरला आहे.
दुधेभावीपासूनच पाच किलोमीटर अंतरावर घोरपडी तलाव आहे. या तलावात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जर काम केले, तर ते कमी खर्चात होईल, असा प्रस्ताव सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक चंद्रकांत हाक्के यांनी संजयकाका पाटील व जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्यासमोर मांडला व त्यांच्या उपस्थितीत दोन महिन्यापूर्वी भूमिपूजन करून हे काम सुरू करण्यात आले.
खासदार संजयकाका पाटील, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, चंद्रकांत हाक्के, तहसीलदार शिल्पा ठोकडे, सांगोल्याचे भाजपचे श्रीकांत देशमुख यांच्या उपस्थितीत दुधेभावी तलावातून घोरपडी तलावात पाणी सोडण्यात आले. राज्यातील पहिलाच ‘कमी खर्चात तलाव जोड’ हा आदर्शवत प्रकल्प पूर्ण झाला आहे.
दुधेभावी तलावातून घोरपडी तलावात पाणी सोडल्यामुळे दुधेभावीचा काही भाग, ढोलेवाडी, बेवनूर या गावातील लाभक्षेत्रास याचा चांगला फायदा होणार आहे. येथील शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची पेरणी केली आहे. पण पाण्याविना ही पिके वाळू लागली होती. जनावरांनाही पिण्यास पाणी मिळेना, अशी बिकट परिस्थिती असतानाच दुधेभावी तलावातून कालव्यात पाणी सोडल्याने या भागातील सर्वच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यावेळी दुधेभावी तलावातून घोरपडी तलावात पाणी सोडले. त्याचबरोबर या तलावावर असणाऱ्या कालव्यामधूनही शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे पाणी सोडण्यात आले. त्यामुळे या तलावाखालील असणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
या तलावातून पाणी सोडणार आहेत असे समजल्यानंतर, या तलावावर शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी राजाराम पाटील, कोंडीबा पाटील, खाजा खाटीक, भगवान फोंडे, अनिल बाबर आदी उपस्थित होते.
घोरपडी तलावात पाणी सोडण्याच्या कार्यक्रमास हायूम सावनूरकर, अनिल शिंदे, दादासाहेब कोळेकर, तमाण्णा घागरे, विकास हाक्के, डॉ. दिलीप ठोंबरे, बाळासाहेब पाटील, शिवाजी खरात, संजय खरात, बंडू पाटील उपस्थित होते. जास्त क्षमतेने टेंभूचे पाणी जर जास्त दिवस असेच सुरू ठेवले, तरच या राज्यातील आदर्शवत प्रकल्पाचा फायदा जनतेस होणार आहे. जर पाणी लवकर बंद केले, तर या भागातील शेतकऱ्यांच्या ज्या आशा पल्लवित झाल्या आहेत, त्या परत कोमेजून जातील व पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येईल. त्यामुळे प्रशासनाने नियमित पाणी सोडून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशीच मागणी या भागातील सर्वसामान्य जनतेतून होत आहे. (वार्ताहर)
सायफन पध्दत : पाण्याचा मार्ग मोकळा
खासदार व जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन महिन्यापासून सहाशे मीटर लांब, चार मीटर रूंद व खोल असा कालवा काढण्याचे काम सुरू होते. मात्र तलावात पुरेसे पाणी नव्हते. दुधेभावी तलावाची पाणी साठवण क्षमता १४०.६५ फुटाची आहे. मात्र तेवढे पाणी तलावात उपलब्ध नव्हते. त्यामुळे खासदार पाटील यांनी प्रयत्न करून या भागाची विदारक अवस्था अधिकाऱ्यांसमोर मांडून, जास्त क्षमतेने पाणी सोडण्याची मागणी केली व हा तलाव आता ७0 टक्के भरण्यात आला आहे. सहाशे मीटर लांबीच्या कालव्याचे काम पूर्ण झाल्याने पुढील पाणी सायफन पध्दतीने घोरपडी तलावात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.