मातीतून निर्मिल्या सुबक गणेशमूर्ती!
By admin | Published: September 13, 2015 09:08 PM2015-09-13T21:08:33+5:302015-09-13T22:18:29+5:30
सातारकरांचा प्रतिसाद : पर्यावरणपूरक उत्सवासाठी कलाकरांचा पुढाकार
सातारा : प्लास्टर आॅफ पॅरिसपासून बनविलेल्या मूर्तींमुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असल्याचे ‘लोकमत’ने वेळोवेळी दाखवून दिले आहे. त्यामुळे सातारा शहरात यंदा पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा आग्रह धरला जात आहे. याचाच विचार करून संस्कृती कला अकादमीच्या कलाकारांनी पारंपरिक बाज जपत शाडूपासून अत्यंत सुबक, सात्विक अशा मूर्ती बनविल्या असून, त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.संस्कृती कला अकादमी पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी प्रयत्न करत आहे. विविध शाळांमध्ये जाऊन शाडूच्या मूर्तीचे प्रशिक्षण देण्याबरोबरच प्लास्टर आॅफ पॅरिस आणि माती यापासून बनविलेल्या मूर्ती कशा ओळखाव्यात याचे धडे देत आहे. पर्यावरणाची हानी होऊ नये, जलस्रोत दूषित होऊन नयेत, यासाठी या कलावंतांनी शाडूच्या विविध रूपांतील मूर्तींना आकार दिला आहे. कागदाचा लगदा, नैसर्गिक डिंग आणि माती यांचे मिश्रण करून या मूर्ती बनविण्यात आल्याचे प्रसाद चव्हाण यांनी सांगितले.चव्हाण म्हणाले, ‘प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती आकर्षक आणि स्वस्त वाटत असल्या तरी पर्यावरणाच्या दृष्टीने महागात पडत आहेत. रासायनिक रंगामुळे पाण्याचे स्रोत दूषित होत आहेत. याबाबत ‘लोकमत’ जनजागृती करत असल्यामुळे याचे महत्त्व समजू लागले आहे. (प्रतिनिधी)
विविधढंगी मूषक...
मूषकाच्या विविध भावमुद्रा असलेल्या मूर्ती संस्कृतीने साकारल्या आहेत. सहा पद्धतीच्या उंदरांच्या सेटला ग्राहक पसंती देत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
फरक कसा ओळखावा
माती आणि ‘पीओपी’ मधील फरक ओळखता येत नाही. माती आणि ‘पीओपी’ यांच्या मिश्रणातून मूर्ती बनविल्याचे सांगूून फसवणूक करतात. ‘पीओपी’ची मूर्ती मातीच्या मूर्तीपेक्षा हलकी आणि आतून पांढरी असते.