राष्ट्रीय स्पर्धेत सुदेष्णाला सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:37 AM2021-02-12T04:37:39+5:302021-02-12T04:37:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : राज्यस्तरावर दहा वेळा सुवर्णपदके पटकावणाऱ्या जावली एक्सप्रेस सुदेष्णा शिवणकर हिने आसाम येथे सुरू असलेल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : राज्यस्तरावर दहा वेळा सुवर्णपदके पटकावणाऱ्या जावली एक्सप्रेस सुदेष्णा शिवणकर हिने आसाम येथे सुरू असलेल्या ३६ व्या राष्ट्रीय ज्युनिअर चॅम्पियनशिप २०२१ मध्ये २०० मीटर धावणे प्रकारात सुवर्णपदकावर मोहर उमटवली असून, १०० मीटर धावणे प्रकारात तिने कांस्यपदक पटकावून पुन्हा एकदा साताऱ्याच्या क्रीडाक्षेत्राची मान उंचावली आहे.
पुणे येथे राज्यस्तरीय ज्युनिअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तिने दोन सुवर्णपदकांना गवसणी घातली होती. त्यामुळे राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली होती. तिने भोपाळ येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते; तर गुहाटी (आसाम) येथे दि. ६ ते १० फेब्रुवारी या कालावधीत झालेल्या ३६व्या राष्ट्रीय ज्युनिअर चॉम्पियनशिपमध्ये सुदेष्णा शिवणकर हिने २०० मीटर धावणे क्रीडाप्रकारात सुवर्णपदक मिळवून यश संपादन केले आहे. याच स्पर्धेत १०० मीटर धावणे प्रकारातही तिने कांस्यपदकावर मोहर उमटवली आहे.
एकाच राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सलग दोन पदके मिळवून तिने आपल्या खेळातील सातत्य कायम राखले आहे. अत्यंत चुरशीच्या स्पर्धेमध्ये सुदेष्णा बहारदार कामगिरी करीत आहे. तिला तिचे मार्गदर्शक बळवंत बाबर यांचे मार्गदर्शन मिळत आहे. सुदेष्णा ही यशवंतराव चव्हाण विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. कॉलेजचे प्राचार्य जाधव व गुजर यांचेही तिला प्रोत्साहन लाभत असून त्यामुळेच मी हे यश मिळवू शकले, अशी भावना सुदेष्णाने व्यक्त केलीय.
साताऱ्यात सध्या सरावासाठी मैदान उपलब्ध नसल्याने सराव करणे अत्यंत अवघड होत आहे. तरीही या जावली एक्सप्रेसने राष्ट्रीय स्तरावर अप्रतिम कामागिरी केली आहे. क्रीडा क्षेत्रातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.