धुराडी पेटल्याने साखरवाडी गजबजली...! : ऊस उत्पादक शेतकरी, कामगारांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 12:42 AM2019-12-13T00:42:31+5:302019-12-13T00:45:27+5:30
नसीर शिकलगार । फलटण : थकीत देण्यामुळे बंद पडलेला आणि तोट्यात गेलेला साखरवाडी (ता. फलटण) येथील न्यू फलटण शुगर ...
नसीर शिकलगार ।
फलटण : थकीत देण्यामुळे बंद पडलेला आणि तोट्यात गेलेला साखरवाडी (ता. फलटण) येथील न्यू फलटण शुगर वर्क्स लि. कारखाना बंद पडला होता. तो यंदा दत्त इंडिया शुगर प्रा. लि.ने ताब्यात घेऊन चालू केल्याने साखरवाडी परिसर गजबजला आहे. तालुक्यातील दिवाळखोरीत निघणारी मोठी संस्था वाचून ऊस उत्पादकांचे थकीत पैसे मिळू लागले आहेत. त्यामुळे परिसरातील ऊस उत्पादक व कामगारांना दिलासा मिळाला आहे.
फलटण तालुक्यात साखरवाडीमध्ये सन १९३२ च्या दरम्यान सुरू झालेला न्यू फलटण शुगर साखर कारखाना चुकीच्या आर्थिक नियोजनामुळे कोट्यवधींची कर्जे डोक्यावर घेऊन बंद पडला. गतवर्षीच्या हंगामात गाळप होऊ शकले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची कोट्यवधींची देणी आणि सुमारे ५४५ कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. कॉसमॉस को-आॅप. बँकेने थकबाकीची मागणी केल्यानंतर नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनलमध्ये दि. २० फेब्रुवारी २०१९ रोजी न्यू फलटण कारखाना हस्तांतराबाबत कार्यवाही सुरू झाली.
कॉसमॉसने दोन-तीन वर्षांपूर्वी २५ कोटी रुपये कारखान्याला दिले होते. त्यापैकी १२ कोटी येणे असल्याचे तसेच स्टेट बँक, आयडीबीआय व अन्य बँकांची मोठी देणी असल्याने एनसीएलटी तोडग्यासाठी प्रयत्नशील होते. त्यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे ४९ कोटी आणि कामगारांचे १५-१६ महिन्यांचे पगार व अन्य येणी प्राधान्याने मिळाली पाहिजेत, यासाठी आग्रह धरला.
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने इसेन्शियल कम्युडीटी कायद्यातील तरतुदीनुसार उच्च न्यायालयात शेतकरी/कामगारांची थकीत येणी मिळण्यासाठी दावा दाखल केला. यावर एनसीएलटीने फलटण न्यू शुगर कारखान दत्त इंडिया शुगर प्रा. लि.ला हस्तांतरित केला. तसेच त्यांना ऊसबिलाची मागणी करण्यासाठी अर्ज भरून दिलेल्या ऊसउत्पादकांचे पैसे देण्यास सांगितले आहे. त्याप्रमाणे (एनसीएलटी) च्या माध्यमातून श्री दत्त इंडिया प्रा. लि., मुंबई यांनी न्यू फलटण शुगरची जबाबदारी स्वीकारली असून, शेतकरी व कामगारांची देणी देण्यासह यावर्षीच्या गळीत हंगामात कारखाना सुरू करण्याची तयारी त्यांनी केली होती. सूत्रे हाती येताच अवघ्या १५ दिवसांत गाळपास प्रत्यक्ष सुरुवात झाली असून, कामगारांना अॅडव्हान्स पगार देण्यात आला आहे.
दत्त इंडियाने पहिल्या टप्प्यात १४ कोटी रुपये ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केल्याने कंगाल होत चाललेल्या ऊस उत्पादकाला दोन वर्षांनी पैसे मिळाले आहेत. तो अडचणीतून बाहेर येऊ लागला आहे. तसेच साखरवाडीतील साखर कारखाना सुरू झाल्याने परिसरात वर्दळही वाढू लागली असून, वर्षभर हाताला काम आणि पगार नसलेला कामगारवर्गही उत्साहात काम करू लागला आहे. त्यामुळे परिसरात समाधानाचे वातावरण आहे.
साखरवाडी, ता. फलटण येथील साखर कारखाना दत्त इंडिया शुगर प्रा. लि. कंपनीने चालविण्यासाठी घेतला आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात उसाचे गाळप सुरू झाले आहे.
दत्त इंडियाने आतापर्यंत एनसीएलटीच्या आदेशाप्रमाणे १४ कोटी रुपये मागील काही ऊस उत्पादकांची देणी दिली आहेत. ज्याप्रमाणे आदेश येईल, त्याप्रमाणे पेमेंट करू, या हंगामात इतर कारखाने जो दर देतील, त्या प्रमाणात दर देण्याचा प्रयत्न करू. आत्तापर्यंत १३ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून, हळूहळू उसाचे प्रमाण वाढल्यावर गाळपही वाढेल.
- मृत्युंजय शिंदे उपाध्यक्ष,
दत्त इंडिया शुगर, साखरवाडी
आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ऊस उत्पादकांचे आणि कामगारांचे थकीत बिल मिळावे म्हणून मोठा लढा उभारला आहे. न्यायालयातही दाद मागितली आहे. आता दत्त इंडियाने बंद पडलेला हा कारखाना सुरू केला असला तरी ऊस उत्पादक आणि कामगारांची सर्व देणी लवकर द्यावी. अन्यथा आंदोलन करण्यात येईल.
- नितीन यादव
फलटण तालुकाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना