साखर कारखानदार, लोकप्रतिनिधींनी शासनाला योगदान द्यावे : खंडाईत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:40 AM2021-04-24T04:40:16+5:302021-04-24T04:40:16+5:30
सातारा : राज्यातील सर्व आमदार, कारखानदार आणि सर्व संस्था यांनी पुढे येऊन योगदान द्यावे, अशी मागणी वंचित ...
सातारा : राज्यातील सर्व आमदार, कारखानदार आणि सर्व संस्था यांनी पुढे येऊन योगदान द्यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आली आहे.
याप्रकरणी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोविड - १९ नियंत्रणात येताना दिसत नाही, यासाठी लाॅकडाऊनचा पर्याय निवडला असून, जनतेला वेठीस धरले, वेळप्रसंगी दंड वसूल केला, गुन्हे दाखल केले तरीही जनता सहकार्य करत नाही, असा ठपका जनतेवर ठेवला जात आहे. याप्रकरणी जनतेलाच दोषी धरले जात आहे, ही बाब फार गंभीर आहे.
राज्य शासनाने गेल्या १३ ते १४ महिन्यांत कोविड - १९च्या महामारीतून जनतेला बाहेर काढण्यासाठी आपली आरोग्य सुविधा किती सक्षम केली. तसेच आजच्या परिस्थितीत सर्वच आमदारांनी प्रत्येक गोष्टीत शासनाकडे बोट दाखवून चालणार नाही. सर्व जनतेला आम्हीच तुमचे कर्तेधर्ते आहोत, असे भासवून करोडो रूपये खर्च करून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचीही काही जनतेप्रति बांधिलकी आहेच. मात्र, तेच लोकप्रतिनिधी शासनाकडेच बोट दाखवत आहेत. त्याकरिता मुख्यमंत्र्यांनी सर्व लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये तातडीने आरोग्य सुविधा उभ्या करण्यामध्ये सहभागी होण्याच्या सक्त सूचना द्याव्यात तसेच कारखाने आणि नफेखोरी करणाऱ्या संस्था अडचणीत आल्या की शासनाच्या पॅकेजची अपेक्षा करतात तर आज शासन अडचणीत असताना त्यांना आरोग्य सुविधांच्या उभारणीत सहभागी होण्यासाठी सक्त सूचना शासनाने का देऊ नयेत आणि जे सहभागी होणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा शासन का देत नाही, ही बाब गंभीर आहे, याकडेही शासनाने कटाक्षाने लक्ष देण्याची मागणी वंचितचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.