एफआरपीप्रमाणे ऊस बिलाची रक्कम जमा करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:45 AM2021-08-20T04:45:43+5:302021-08-20T04:45:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कुडाळ : ‘कोरोनाच्या महामारीत संपूर्ण जग थांबलेले असताना, जगाचा पोशिंदा असलेला बळिराजा मात्र थांबलेला नाही; परंतु ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कुडाळ : ‘कोरोनाच्या महामारीत संपूर्ण जग थांबलेले असताना, जगाचा पोशिंदा असलेला बळिराजा मात्र थांबलेला नाही; परंतु अशा परिस्थितीत कुणी आवाज उठवणार नाही, या संधीचा फायदा घेऊनच महाराष्ट्रातील काही ऊस कारखानदारांनी शेतकऱ्यांची ऊस बिले थकविल्याने ऊस उत्पादक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत कारखान्याकडून ३० ऑगस्टपर्यंत एफआरपीप्रमाणे पूर्ण रक्कम ऊस उत्पादकांच्या खात्यात जमा करावी,’ अशी मागणी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र विभागप्रमुख कमलाकर भोसले यांनी केली.
ऊस बिल थकीत ठेवणाऱ्या साखर कारखान्याबाबत शेतकरी संघटनाही आक्रमक झाली असून, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
कमलाकर भोसले म्हणाले, ‘काही ऊस कारखानदारांनी मनमानी करीत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम केले आहे. त्यांची मनमानी शेतकरी संघटना चालू देणार नसून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एफआरपीप्रमाणे पूर्ण रक्कम जमा करावी. कारखाना चालविण्यासाठी ऊस उत्पादक सभासद असून ‘धन्याला धतुरा आणि चोराला मलिदा’ या प्रमाणे महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांची अवस्था झाली आहे. सभासद हा सहकारातील कारखान्याचा मालक असतो. कारखान्यातील साखरनिर्मिती, अतिरिक्त अन्य उपपदार्थ निर्मितीमधून मिळणारा फायदा ६०,४० गुजरात पॅटर्नप्रमाणे महाराष्ट्रातील कारखानदारांनी ऊस उत्पादक सभासदांना येणाऱ्या हंगामात दिलाच पाहिजे.
चौकट :
कोरोनात शेतकरी भरडतोय..
कोरोनाच्या महाभयंकर साथीत शेतकरी भरडला जात आहे. अशातच कारखान्याकडे ऊस जाऊन साधारपणे १५ ते २० दिवसांत बिल मिळणे क्रमप्राप्त आहे. याप्रमाणे काही कारखान्यांनी याप्रमाणे बिले दिलीही आहेत. मात्र, अजूनही काही कारखान्यांकडून सात ते आठ महिने उलटूनही शेतकऱ्यांना ऊस बिल मिळत नाही. शेतकऱ्यांचा अर्ज घेऊन १००० ते १५०० रुपये प्रतिटन बिल देऊ करत शेतकऱ्यांना आर्थिक संकटात आणण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे एफआरपीप्रमाणे तत्काळ ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, अशी शेतकरी व शेतकरी संघटना मागणी करत आहे.