ऊस उत्पादकांना ‘अच्छे दिन’
By admin | Published: September 29, 2015 09:58 PM2015-09-29T21:58:48+5:302015-09-30T00:10:16+5:30
रणजित नाईक-निंबाळकर : नीरा खोऱ्यात ‘लोकनेते’कडून सर्वाधिक दर
फलटण : नीरा खोऱ्यातील साखरपट्ट्यामध्ये ऊसदराची जोरदार स्पर्धा सुरू असून लोकनेते हिंदुराव नाईक-निंबाळकर साखर कारखान्याने त्यांच्या चाचणी हंगामात गाळपास आलेल्या तालुक्यातील उसाला २२६१ रुपये दर दिला आहे. ऊसदराच्या या स्पर्धेमुळे ऊस उत्पादकांमधून समाधान व्यक्त होत आहे. नीरा खोऱ्यात सर्वाधिक दर देणारा हा कारखाना ठरला आहे.
फलटण तालुक्यात उसाचे प्रचंड उत्पादन होत असून तालुक्यातील दोन्ही साखर कारखान्यांना ऊस देऊन मुबलक प्रमाणात राहणारा ऊस तालुक्याबाहेरील कारखान्यांकडे जात होता. बाहेरील कारखानदारांकडून ऊस उत्पादकांची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी तसेच दुष्काळी पट्ट्यातील जनतेचे जीवनमान उंचावून बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी दुष्काळी व डोंगराळ उपळवे (ता. फलटण) येथे लोकनेते हिंदुराव नाईक-निंबाळकर साखर कारखान्याची उभारणी केली. याच्या गळीत चाचणी हंगामात आलेल्या उसाला पहिला हप्ता १९०१ रुपये आपण दिला. दुसरा हप्ता ३६० रुपये असा एकूण २२६१ रुपये दर आपण तालुक्यातील ऊस उत्पादकांना देत असल्याचे कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह नाईक -निंबाळकर यांनी सांगितले.
चालू हंगामातही आपण स्पर्धात्मक दर देणार असून कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन दि. १४ आॅक्टोबर रोजी व पहिल्या गळीत हंगामाचा शुभारंभ दि. १६ आॅक्टोबर रोजी होणार आहे. त्याचवेळी कारखान्याच्या १९.५ मेगावॉट सहवीजनिर्मिती प्रकल्पाचा शुभारंभही करणार आहे. कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन ५००० मे. टन असून या हंगामात ७ ते ८ लाख मे. टन गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात
आले आहे. तालुक्यातील ऊस
उत्पादकांनी ऊसदराची चिंता करू नये, असे आवाहन रणजितसिंह
नाईक-निंबाळकर यांनी केले
आहे. (प्रतिनिधी)
सर्वाधिक दराने ऊसदराची स्पर्धा
नीरा खोऱ्यामध्ये माळेगाव, सोमेश्वर यासारखे मोठे कारखाने असताना आजारी श्रीराम साखर कारखान्याने सर्वाधिक २२०७ रुपये दर दिला होता. आता यात लोकनेते हिंदुराव नाईक-निंबाळकर साखर कारखान्याने २२६१ रुपये दर जाहीर केल्याने साखरपट्ट्यात खळबळ उडाली आहे. तालुक्यातील साखरवाडी येथील न्यू फलटण शुगर वर्क्सने १८०० रुपये दर दिला आहे. त्यामुळे तो आता किती दर जाहीर करतोय, तसेच श्रीराम आणखी जादा दर वाढवून देणार का, याकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे. ऊसदराची स्पर्धा ऊस उत्पादकांना फायदेशीर ठरत आहे.
इतरांपेक्षा जादा दर देणार : रणजितसिंह
लोकनेते हिंदुराव नाईक-निंबाळकर साखर कारखान्याकडे येत्या हंगामात गाळपास येणाऱ्या फलटण तालुक्यातील ऊस उत्पादकांच्या उसाला इतर कारखान्यापेक्षा जास्त दर आपण देणार आहोत. तालुक्यातील ऊस उत्पादकांना अच्छे दिन आणण्याचा दिलेला शब्द आपण पाळत आहोत, असे रणजितसिंह यांनी स्पष्ट केले.