शेतकऱ्यांनी समूहातून खरेदी केल्या ऊसतोड मशीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:55 AM2021-01-02T04:55:27+5:302021-01-02T04:55:27+5:30
पिंपोडे बुद्रुक : ऊस कारखान्याच्या ऊसतोड नियमानुसार ऊसतोडीस होणारा विलंब व त्यासाठी ऊसतोड कामगारांवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा होणारा खर्च ...
पिंपोडे बुद्रुक : ऊस कारखान्याच्या ऊसतोड नियमानुसार ऊसतोडीस होणारा विलंब व त्यासाठी ऊसतोड कामगारांवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा होणारा खर्च या बाबींचा विचार करून कोरेगाव तालुक्यातील उत्तरेकडील शेतकऱ्यांनी एकमेकांच्या सहकार्यातून व जिल्हा सहकारी बँकेच्या आर्थिक पतपुरवठ्यातून ऊसतोड मशीन खरेदी केल्या आहेत. त्यामुळे परिसरातील ऊस तोडणी योग्य वेळेत होण्यास मदत होत आहे.
ऊस तोडणी कामगारांची संख्या अपुरी आहे. यामुळे बहुतांशी वेळा ऊस तोडणीस विलंब होतो. त्याचा आर्थिक फटका उन्हाळ्यात पाण्याची कमतरता असणाऱ्या परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसतो. ही बाब लक्षात घेऊन करंजखोप येथील प्रगतशील उच्चशिक्षित शेतकरी व करंजखोपचे लोकनियुक्त सरपंच लालासाहेब नेवसे व बंधू यांनी तसेच सोनके येथील विकास सेवा सोसायटीचे संचालक राहुल धुमाळ व परिसरातील शेतकरीमित्र यांनी एकत्रित येत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक मदतीने प्रत्येकी एक ऊस तोडणीचे मशीन खरेदी केले आहे. त्यामुळे परिसरातील ऊस तोडणी योग्य वेळेत होऊन शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टळणार आहे.
दरम्यान, परिसरातील बहुतांशी शेतकरी बँका व तत्सम संस्थांच्या आर्थिक मदतीच्या साहायाने एकजुटीने शेतीमध्ये विविध प्रयोग करत आहेत.
कोट
ऊस तोडणी यंत्र व त्यासोबत लागणारी यंत्रणा यांची खरेदी ही बाब मोठी खर्चिक आहे. त्यासाठी शासनाने संबंधित यंत्रांसाठी दिले जाणारे अनुदान नियमित करून त्यात वाढ करावी. कर्जावरील व्याजदर कमी करण्याची तरतूद करण्याची गरज आहे.
- राहुल धुमाळ
संचालक, विकास सेवा सोसायटी, सोनके.
कोट २
ऊस तोडणी यंत्राच्या खरेदीमुळे ऊस तोडणीस विलंब होऊन होणारे नुकसान टाळणे शक्य झाले आहे. या काळात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणारा मन:स्ताप कमी झाला आहे
- लालासाहेब नेवसे
सरपंच, करंजखोप
चौकट
अनुदान पूर्ववत करण्यासाठी पाठपुरावा
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने आतापर्यंत ३६ ऊसतोड मशीनसाठी ३८ कोटीचा आर्थिक पतपुरवठा केला आहे. तसेच याअंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानाची प्रक्रिया पूर्ववत करण्यासाठी बँकेकडून पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे व्यवस्थापक राजेंद्र सरकाळे यांनी दिली.
फोटो ०१पिंपोडे बुद्रुक
कोरेगाव तालुक्यातील करंजखोप परिसरात यांत्रिक पद्धतीने ऊसतोड केली जात आहे. (छाया : संतोष धुमाळ)