कुसळाच्या माळावर ऊस, कांदा, भाजी..! श्रमदानामुळे कोटीचे उत्पन्न वाढणार : बनगरवाडीत २५० हेक्टरने बागायत क्षेत्र वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 12:14 AM2018-08-05T00:14:37+5:302018-08-05T00:15:02+5:30
बऱ्यापैकी पाऊस होऊनही पिकातून हाती फारसे काय यायचे नाही. त्याच बनगरवाडीत सध्या वॉटर कपच्या कामामुळे कुसळ उगवणारे २५० हेक्टर क्षेत्र बागायत झाले आहे.
नितीन काळेल ।
सातारा : बऱ्यापैकी पाऊस होऊनही पिकातून हाती फारसे काय यायचे नाही. त्याच बनगरवाडीत सध्या वॉटर कपच्या कामामुळे कुसळ उगवणारे २५० हेक्टर क्षेत्र बागायत झाले आहे. तर अवघ्या एका पावसात पाणी उपलब्ध झाल्याने सध्या १०० एकरांवर कांदा, ३५० एकरवर ऊस आणि २० एकरवर भाजी पिकत आहे. त्यामुळे या खरीप हंगामात गावाचे उत्पन्न किमान एक कोटी रुपयाने वाढणार आहे.
माण तालुक्यातील बनगरवाडी (वरकुटे मलवडी) गाव इतर दुष्काळी गावाप्रमाणेच. येथील बहुतांश लोकांचा व्यवसाय मेंढपाळाचा. तरुण मुले मुंबई, पुणे येथे नोकरीसाठी. टोकाचे राजकारण खेळणाºया या गावात वॉटर कपच्या माध्यमातून मनसंधारण झाले आणि गाव बदलले. गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्र १३५० हेक्टर असले तरी अर्धी जमीन ही माळरानाची होती. त्यामुळे शेती पिकवायची झाली तर जेमतेमच उत्पन्न हाती यायचे. त्यातच आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावाने बदलायचं ठरवलं. त्यासाठी वॉटर कप स्पर्धेत या गावाने प्रथमच सहभाग घेतला. मुंबई, पुणे येथील तरुण, नोकरदार व इतर राज्यात कामासाठी गेलेल्यांनी पुढाकार घेत लोकवर्गणीही गोळा केली. वॉटर कप स्पर्धेच्या ४५ दिवसांच्या कामात गावाने माळराने फोडून पाणीसाठा वाढविण्यासाठी प्रयत्न केला.
स्पर्धेच्या काळात एकूण ३ लाख ३० हजार घनमीटर इतके काम केले. त्यामध्ये डीपसीसीटीचे २५ हजार घनमीटर, सीसीटी ७२०० घनमीटर, ४०० हेक्टरवर कंपार्टमेंट बंडींग केले. तसेच ३० शेततळी निर्माण करण्यात आली. १० मातीनाला बांध, दोन जुन्या पाझर तलावांची दुरुस्ती, १८० दगडी बांध, साडेतीन किलोमीटर लांबीच्या ओढ्याचे खोली व रुंदीकरण करण्यात आले. त्याचे दृश्य परिणाम सध्या दिसू लागले आहेत.
बनगरवाडी व परिसरात जून महिन्यात एकच मोठा पाऊस झाला आहे. त्यानंतर पावसाने दडी मारली ती आजही कायम आहे. पण, वॉटर कप स्पर्धेतील कामामुळे विहिरी पूर्ण भरल्या आहेत. सर्वत्र पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे कधी नव्हे ते लोकांनी खरीप हंगामात या पाण्याच्या भरवशावरच नवीन २५० हेक्टर क्षेत्र बागायत करण्याचा निर्णय घेतला. खरिपात बाजरीशिवाय कधीही इतर पीक न घेणाºया शेतकºयांनी जून, जुलैमध्येच ऊस, कांद्याचे पीक लावले. तर अनेकांनी भाजीपाला केला आहे. सध्या नव्याने १०० एकरांवर कांदा, ३५० एकरवरील ऊस डोलू लागला आहे. तर बाजरी ७५० एकरवर घेण्यात आली आहे.
येथील भाजीपाला आता तालुक्यातील आठवडी बाजारात जात आहे. त्यामुळे शेतकºयांना रोजच्या रोज पैसा मिळू लागला आहे. तसेच अनेकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. येत्या काळात फळबागा वाढविण्यासाठी शेतकºयांनी नियोजन केले आहे.
३० गुंठ्यातील ढोबळीमधून ५ लाख...
बनगरवाडीत पाण्याने किमया केली आहे. त्यामुळे माळरानावर पिके उगवली आहेत. येथील शेतकरी आबासो बनगर यांनी अवघ्या ३० गुंठे क्षेत्रावर ढोबळी मिरचीचे पीक घेतले आहे. या ढोबळी पिकाला चांगला दरही मिळाला. यामधून आतापर्यंत बनगर यांना ५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. सध्याही त्यांच्या रानात ढोबळीचे पीक असून, त्यातून आणखी किमान दोन लाखांचे उत्पन्न मिळेल, असा अंदाज आहे.