‘सह्यााद्री’चा ३५० हेक्टर क्षेत्रावरील ऊस उभा
By admin | Published: May 29, 2015 09:54 PM2015-05-29T21:54:07+5:302015-05-29T23:46:55+5:30
शेतकऱ्यातून नाराजी : नियोजनाचा अभाव; कोरेगाव दक्षिण भागात साखर कारखान्याकडून बघ्याची भूमिका...
रहिमतपूर : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या कोरेगाव तालुक्यातील दक्षिण भागातील कार्यक्षेत्रातील सुमारे ३५० हेक्टर ऊस अजून उभा आहे. योग्य नियोजनाचा अभाव कार्यक्षेत्रात असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. या भागातील कारखान्याचे उपाध्यक्ष व संचालक फक्त बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
सह्याद्री्र कारखान्याच्या निवडणुकीत आ. बाळासाहेब पाटील यांच्यावर या परिसरातील शेतकऱ्यांनी मोठा विश्वास ठेवून परिसरातील उमेदवारांना निवडून आणले. आमदारांनी या परिसरातील लक्ष्मी संभाजीराव गायकवाड यांना उपाध्यक्षपद दिल्याने परिसरात फार मोठा उत्साह होता. तसेच नंदकुमार पाटील व कांतीलाल पाटील हे दोन संचालकसुद्धा कार्यरत आहेत. परंतु या भागात वाठार (किरोली) व रहिमतपूर असे दोन गट आहेत. येथे त्यांचे नियंत्रण राहिलेले दिसत नाही.
वाठार गटात २५० हेक्टर तर रहिमतपूर गटात १५० हेक्टर ऊस ताडीविना अजून उभा आहे. त्यातच सभासदाच्या काही लागणीसुद्धा गेल्या नाहीत. एकरी १० ते १२ हजार रुपये ऊस तोडण्यासाठी टोळ्या मागत आहेत. तरीही ऊस जाळूनच नेण्यास सुरुवात केली आहे. पैसे दिले नाहीत तर ऊस तोडला जात नाही. आगामी पावसाची भीती असल्यामुळे शेतकरी पैसे देवून ऊस तोडत आहेत. त्यासाठी परिसरातील संचालकांनी टोळ्या वाढवून लवकरात लवकर शेतकऱ्याचा ऊस कसा जाईल, यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा सभासद वर्गातून होत आहे.
प्रशासनाच्या बैठका होवून नियोजन करावे, अशी अपेक्षाही शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. याबाबत कारखान्याच्या उपाध्यक्षांशी संपर्क होवू शकला नाही. (वार्ताहर)
रहिमतपूर गटातील सुमारे १०० हेक्टर ऊस शिल्लक आहे. दि. १० जूनपर्यंत ऊस संपविण्याचा प्रयत्न प्रशासनाचा आहे. नोंदीचा कोणताही ऊस शिल्लक राहणार नाही, अशी यंत्रणा राबवत आहोत.
-विजयकुमार कदम, फिल्डमन
पावसाची भीती असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. माझा स्वत:चा लागण आणि खोडवा सात एकर ऊस अजून तोडलेला नाही. असे अनेक शेतकरी आहेत. ऊसतोड टोळ्या वाढविण्याची गरज आहे.
- संभाजी व्यंकटराव माने, शेतकरी रहिमतपूर.