तोडणीला विलंब झाल्याने उसाचे तुरे झडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:39 AM2021-01-25T04:39:17+5:302021-01-25T04:39:17+5:30
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसरातील अनेक गावांतील १८-१९ महिने कालावधी होत आलेले आडसाली ऊस अद्याप तोडणीच्या प्रतीक्षेत आहे. ...
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसरातील अनेक गावांतील १८-१९ महिने कालावधी होत आलेले आडसाली ऊस अद्याप तोडणीच्या प्रतीक्षेत आहे. उसाला आलेले तुरे झडून गेले अन् वजनात घट होऊ लागली तरी उसाला तोड येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
रहिमतपूर परिसर हा ऊसाचे आगर म्हणून ओळखला जातो. या परिसरातील अनेक गावांमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गतवर्षी जून-जुलै महिन्यामध्ये आडसाली उसाच्या लागणी केल्या आहेत. प्रामुख्याने आडसाली उसाच्या लागणीसाठी विविध वानाला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. पाऊस दमदार कोसळल्यामुळे उसाचे फड अगदी जोमदार आले आहेत. या बरोबरच हंगामी ऊस लागवड म्हणून २०१९ मधील ऑक्टोबर-नोव्हेबर या महिन्यांमध्ये वेगवेगळ्या वानांच्या उसाच्या लागवडी करण्यात आल्या. हंगामी लागवडीतील ऊस ही चांगले दमदार आले आहेत. यंदा उसाचा हंगाम नेहमीप्रमाणे सुरू झाला. परंतु साखर कारखानदारांनी पुरेशा ऊस मजूर टोळ्या गावोगावी उपलब्ध करून न दिल्यामुळे अनेक आडसाली उसाचे फड तोडणीच्या प्रतीक्षेत आहेत.
आडसाली उसाला सध्या १९ महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आला आहे. त्यामध्येच शेवटच्या टप्प्यात झालेल्या अति पावसामुळे उसाला तुरे आले व उसाची वाढ खुंटली. लवकर ऊसतोड न मिळाल्याने आलेले तुरे ही झडून गेले अन् उभ्या उसाला कोंब फुटून उसाची केरसुनी होऊ लागली आहे. रहिमतपूर परिसरातील गावांमध्ये काही कारखान्यांच्या मोजक्याच ऊसतोड मजूर टोळ्या ऊसतोडणीचे काम करत आहेत, तर काही ऊसतोडणी मशीन ऊसतोडणीचे काम करत आहेत. परंतु उसाचे कार्यक्षेत्र बघता तोडणीसाठी उपलब्ध असलेली यंत्रणा तोकडी पडत आहे. त्यामुळेच परिसरातील अनेक गावांत अद्याप जून-जुलै दरम्यान लागणी केलेल्या आडसाली उसाची तोडणी बाकी आहे. या उसाला आलेले तुरे झडून गेले. उभ्या उसाला कोंबारे फुटले असून, आतून ऊस पोकळ होऊ लागला आहे. वजनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
चौकट
खोडवा आणि रडव्याला तोड कधी?
उसाच्या लागणीच लटकल्यामुळे खोडवा आणि रडवा उसाला तोड कधी येणार? असा विचार करून उसाचे फडमालकावर डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांचे अधिक नुकसान टाळण्यासाठी रहिमतपूर परिसरात जिल्ह्याबाहेरील इतर ऊस कारखानदारांनीही आपल्या ऊस मजूर टोळ्या पाठवून ऊसतोडणीस घेऊन जाण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा रसरशीत व दमदार असलेल्या उसाच्या फुकण्या होण्यास वेळ लागणार नाही. तरी जास्तीजास्त कारखानदारांनी या भागात ऊस मजूर टोळ्या पाठवून ऊस तोडून न्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
फोटो : २३रहिमतपूर-शुगर केन
रहिमतपूर येथील आडसाली उसाचे तुरे झडू लागले आहेत. (छाया : जयदीप जाधव)